औरंगाबाद - राज्यात सेना-भाजप युतीची घोषणा झाल्यानंतर त्याचे परिणाम राज्यात दिसून येण्याची शक्यता आहे. औरंगाबाद जिल्हापरिषदेत सेनेसोबत सत्तेत असलेली काँग्रेस आपला पाठिंबा काढण्याच्या तयारीत आहे.
औरंगाबाद जिल्हापरिषदेत काँग्रेस सेनेचा पाठिंबा काढण्याच्या तयारीत - विरोधी पक्ष
औरंगाबाद जिल्हापरिषदेत सेनेसोबत सत्तेत असलेली काँग्रेस आपला पाठिंबा काढण्याच्या तयारीत आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने सर्वाधिक २३ जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेला १९ जागांवर विजय मिळाला होता तर काँग्रेस १८ जागांवर विजयी झाली होती. मात्र, शिवसेनेने काँग्रेसच्या मदतीने भाजपला सत्तेबाहेर ठेवले. सेनेच्या देवयानी डोणगावकर यांच्या गळ्यात जिल्हा परिषद अध्यक्षाची माळ पडली. तर सेनेला पाठिंबा दिल्याने काँग्रेसला जिल्हापरिषदेची ३ पदे मिळाली. त्यात उपाध्यक्ष पद आणि २ सभापती पद मिळाले. अशाप्रकारे गेली २ वर्षे या २ विरोधी पक्षांनी एकत्र सत्ता गाजवली. परंतु, आता या आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याला कारण ठरली ती देशात नुकतीच घोषित झालेली सेना आणि भाजपची युती.
मुंबईत युतीची घोषणा होताच काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना संपर्क करून पुढील सूचना देण्याचा आग्रह धरला. मात्र, नुकत्याच जाहीर झालेल्या युतीमुळे भाजप जिल्हापरिषदेत सेनेला साथ देऊन जिल्हा परिषदेच्या सत्तेत वाटेकरी होण्याची शक्यता आहे. मात्र ६ महिन्यात जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यावेळी सेनेचाच अध्यक्ष होईल, अशी मागणी सेनेची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, काँग्रेसच्या वरिष्ठांनी अद्याप पुढची दिशा ठरवली नाही. तसेच याबाबत काँग्रेसचे पदाधिकारी अधिकृतरित्या बोलत नसले तरी वरिष्ठांनी आदेश देताच काँग्रेस आपला पाठिंबा काढेल, अशी माहिती काँग्रेस शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी दिली.