छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी रात्री उशिरा जिल्ह्यातील धार्मिक स्थळांना भेट दिली. सध्या श्रावण महिना सुरू आहे. हिंदू संस्कृतीमध्ये हा धार्मिक महिना समजला जातो. आम्ही कोणासारखा दिखावा करत फिरत नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. यावेळी त्यांनी औरंगजेब कबर स्थळी भेट देणे टाळले. मी ज्या पक्षात काम करतो, त्या पक्षात धार्मिक भावना दुखावण्याचे कोणतेही काम करत नाही. त्यामुळे जे सर्व धर्माचे प्रतीक आहे, त्या ठिकाणी मी दर्शनासाठी जातो अशी प्रतिक्रिया नाना पटोले त्यांनी माध्यमांना दिली.
'मीच' प्रदेशाध्यक्ष राहणार :काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. याबाबत नाना पटोले यांना विचारले असता, आगामी सर्व निवडणुका माझ्याच नेतृत्वाखाली लढवल्या जातील, असे उत्तर त्यांनी दिले आहे. नाना पटोले सध्या छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शहरात त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी घेत चर्मकार समाजाचा बांधवांशी वार्तालाप केला. नुकतेच पावसाळी अधिवेशनात डबल इंजिन सरकार असूनही शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करू शकले नाहीत. नोकर भरती सुरू असताना त्यातून पैसे उकळण्याचे धंदे सुरू करण्यात आले आहेत. या सरकारला आता सत्तेतून मुक्त होण्याची वेळ आली आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.