औरंगाबाद -विधानसभा निवडणुकीचा कौल स्पष्टपणे युतीला मिळाला असून औरंगाबाद जिल्ह्यातून आघाडी आणि काँग्रेसला खातेही खोलता आलेले नाही. काँग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या पराभवाने जिल्ह्यातील काँग्रेस संपुष्टात आली का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
कल्याण काळेंच्या पराभवाने औरंगाबाद जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार? हेही वाचा - नगरमध्ये हातकणंगले पॅटर्न : राम शिंदेंनी रोहित पवार यांना बांधला 'विजयी' फेटा
औरंगाबाद पूर्वची जागा काँग्रेसने समाजवादी पक्षाला सोडली. मात्र, समाजवादी पक्षासोबत झालेल्या वादामुळे आघाडीत बिघाडी झाली. त्यामुळे काँग्रेसने ऐनवेळी अपक्ष उमेदवार असलेल्या युसुफ मुकातीला आपला पाठिंबा जाहीर केला. पश्चिम मतदारसंघात रिपब्लिकन डेमोक्रॅटिक पक्षाला जागा दिली. मात्र, त्या ठिकाणी रमेश गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने निवडणुकीच्या आधीच काँग्रेसच्या चिंतेत वाढ झाली होती.
अब्दुल सत्तार यांच्यानंतर सिल्लोड येथे प्रभाकर पालोदकर याना मिळालेली उमेदवारी सोडून पालोदकर यांनी अपक्ष निवडणूक लढवल्याने काँग्रेसने नवख्या कैसर आझादला उमेदवारी दिली. त्यामुळे सर्व भिस्त होती ती फुलंब्रीचे माजी आमदार कल्याण काळे यांच्यावर. मात्र, त्यांच्या प्रचारासाठी काँग्रेसने ना कुठली प्रचारसभा घेतली ना कुठल्या बड्या नेत्याने रोड शो केला. एकट्या कल्याण काळेंच्या जीवावर लढलेली निवडणूक काँग्रेसला चांगलीच भोवली.
काँग्रेसच्या सर्वच उमेदवारांचा पराभव झाला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने लावलेला जोर कमी पडला आणि राष्ट्रवादीने लढवलेल्या 5 जागांवर त्यांना पराभव स्वीकारावा लागला. तर उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वच जागांवर युतीला जनादेश मिळाल्याने औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी हद्दपार झाल्याच पाहायला मिळाले. त्यामुळे आगामी औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीत याचा परिणाम होईल असा अंदाज राजकीय अभ्यासक सतीश रेंगे यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - 'कराड दक्षिण'वर पुन्हा पृथ्वी'राज'!