औरंगाबाद -मनपाला न सांगता, कुठलेही कागदपत्र न घेता उपजिल्हाधिकाऱ्यांचे एक पथक कोरोनाबाधिताच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यासाठी गेल्याचा प्रकार औरंगाबादमधे समोर आला आहे. याला नागरिकांनी विरोध केल्यावर त्यांची समजूत काढणे पथकाला अवघड गेले. मात्र काही वेळानंतर आलेल्या पथकाला लोकांनी सहकार्य केले.
औरंगाबादेत तपासणीसाठी गेलेल्या कोरोना पथकाला नागरिकांचा विरोध, व्हिडिओ व्हायरल
सोमवारी रात्री औरंगाबादच्या बुढीलेन भागात पीपीई किट घातलेले एक पथक दाखल झाले. एका वृद्धाचे नाव सांगत ती व्यक्ती कुठे राहते याबाबत विचारणा केली. या व्यक्तीची तपासणी करायची असल्याचे या पथकाने सांगितले. त्यावेळी त्या भागातील लोकांनी पथकाला विरोध केला. मात्र, नागरिकांचा विरोध गैरसमजातून झाल्याचे मनपा आरोग्य अधिकारी नीता पाडळकर यांनी सांगितले आहे.
सोमवारी रात्री औरंगाबादच्या बुढीलेन भागात पीपीई किट घातलेले एक पथक दाखल झाले. एका वृद्धाचे नाव सांगत ती व्यक्ती कुठे राहते याबाबत विचारणा केली. या व्यक्तीची तपासणी करायची असल्याचे या पथकाने सांगितले. त्यावेळी त्या भागातील लोकांनी पथकाला विरोध केला. मात्र, नागरिकांचा विरोध गैरसमजातून झाल्याचे मनपा आरोग्य अधिकारी नीता पाडळकर यांनी सांगितले आहे. हे पथक बुढीलेन भागात गेल्याचा आणि लोकांनी त्यांना विरोध केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा प्रकार समोर आला. या पथकाबाबत औरंगाबाद महानगरपालिकेकडे विचारणा केली असता हे पथक बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी गेले होते. हे पथक पालिकेचे नसून उपजिल्हाधिकाऱ्यांचे होते.
पालिकेच्या पथकावर येणारा भार कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी काही पथके निर्माण केली आहेत. हे त्यातील हे पथक असून कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेण्यासाठी बुढीलेन येथे गेल्याचे समोर आले. मात्र, या पथकाने पूर्व कल्पना न दिल्याने थोडा गोंधळ उडाला होता. दरम्यान, पथकातील अधिकाऱ्यांनी नागरिकांची समजूत काढली आहे. आधी बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना आठ दिवसांसाठी पालिकेच्या अलगीकरण कक्षात पाठवून तपासणी केली जात होती. मात्र, आता आपण त्यांच्या घरीच त्यांची तपासणी करत असून अहवाल पॉझिटिव्ह आल्यावरच आपण त्यांना रुग्णालयात हलवतो. पीपीई किट घालून पथक गेल्याने नागरिकांना अहवाल नसताना कोणाला घ्यायला आले, असा गैरसमज झाल्याने हा प्रकार घडला. मात्र, नंतर नागरिकांनी सहकार्य केले असून काही लोकांचे स्वॅब आम्ही तपासणीसाठी आणले आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन मनपा आरोग्य अधिकारी डॉ नीता पाडळकर यांनी यावेळी केले.