औरंगाबाद- शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. मी रुग्णाची नाडी धरून जप केला तर रुग्ण बरे होतात, असे वक्तव्य खासदार खैरे यांनी राज्य सरकारच्यावतीने आयोजित केलेल्या आरोग्य मेळाव्यात केले आहे. एवढेच नाही तर दिवंगत प्रमोद महाजन यांना रुग्णालयात प्रत्यक्ष भेटता न आल्याने मी जीवनात एकदाच फेल झालो, असे ते म्हणाले.
मी जप केल्याने रुग्ण बरे होतात, आयुष्यात पहिल्यांदाच प्रमोद महाजनांच्याबाबतीत अपयशी ठरलो - खैरे - MP Chandrakant Khaire
दिवंगत प्रमोद महाजन यांना रुग्णालयात प्रत्यक्ष भेटता न आल्याने मी जीवनात एकदाच फेल झालो म्हणाले चंद्रकांत खैरे
सार्वजनिक आरोग्य विभाग व राष्ट्रीय आरोग्य विभागाच्यावतीने शहरातील खडकेश्वर भागात मोफत आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थनी असलेल्या चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्या भाषणात आरोग्याबाबत अनेक उपदेश रुग्णांना दिले.
यावेळी व्यासपीठावर असलेल्या सरकारी रुग्णालयाच्या अधिष्ठातांना उद्देशून खैरे म्हणाले, माझ्याकडे डॉक्टरीची डिग्री नाही. मात्र, मी अनेक लोकांना बरे केले आहे. मी नाडीला हात लावून जप केला तर संध्याकाळपर्यंत मृत्यू होईल, असे डॉक्टरांनी घोषित केलेले रुग्णही बरे होतात.
प्रमोद महाजन हे रुग्णालयात असताना मला भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी काही तरी करा, असे म्हटले होते. मी महाराजांनी दिलेली एक पुडी त्यांच्या उशी खाली ठेवायला सांगितली होती. मी त्यांची नाडी धरून जप म्हणू शकलो नाही. त्यामुळे मी जीवनात पहिल्यांदाच फेल झालो असे खैरे म्हणाले. यावेळी ही अंधश्रद्धा नाही, हे सांगायलादेखील ते विसरले नाहीत. आरोग्य विभागाच्या कार्यक्रमातच उपचार करण्याच्या पद्धतीवरून अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे विधान केल्याने खासदार खैरे वादाच्या भोवऱ्यात अडण्याची शक्यता आहे.