छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):केंद्र सरकारने राज्यातील दोन शहरांची नावे बदलण्याचा निर्णय जाहीर केला. त्यात औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव केल्याचे केंद्र सरकारने परिपत्रक जारी केले. त्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांच्यासोबत नामांतर विरोधी कृती समितीने आंदोलन पुकारले. गेल्या सात दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी आंदोलन सुरू असताना गुरुवारी सायंकाळी कॅन्डल मार्च काढत केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. हातात मेणबत्ती घेऊन औरंगाबादचे नाव औरंगाबादच राहील अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या होत्या.
सिटी चौक पोलिसात गुन्हा दाखल: गुरुवारी सायंकाळी नामांतर विरोधात हजारो लोकांनी हातात मेणबत्ती घेऊन कॅण्डल मार्च काढला. जिल्हाधिकारी कार्यालय ते भडकल गेट या मार्गावर हे आंदोलन करण्यात आले. आंदोलन पूर्वनियोजित असले तरी, पोलीसांची परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळे आंदोलन झाल्यानंतर पोलीसांनी आंदोलनाचे आयोजक खासदार इम्तियाज जलील यांच्यासह रॅलीत सहभागी झालेल्या हजार ते दीड हजार अनोळखी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तपासणी करून पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.