छत्रपती संभाजीनगर High Court Order on Manja : संक्रांतीच्या काळात पतंग उडवताना नायलॉन मांजामुळं अनेक जण जखमी होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. याबाबत वारंवार माध्यमात आणि समाज माध्यमांवर माहिती मिळते. औरंगाबाद खंडपीठानं गंभीर दखल ( सू मोटो) घेत राज्यभर कोंबिंग ऑपरेशन राबवा, असे आदेश पोलीस विभागाला देिले आहेत. तसंच घातक असलेला नायलॉन मांजा येतो कुठून, याबाबत गंभीर दखल घ्यावी. जर कोणी माहिती लपवत असेल तर, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, ज्या ठिकाणी हा मांजा आढळेल ती मालमत्ता सील करावी असे निर्देशही खंडपीठानं दिले आहेत.
राज्यभर कोंबींग ऑपरेशन राबवण्याचे निर्देश : नायलॉन मांजामुळं अनेक ठिकाणी सर्वसामान्यांना त्रास होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही ठिकाणी नागरिकांचा गळा तर कधी हात कापल्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या काही वर्षात अशा घटना सातत्यानं समोर येत असल्यानं, आता घातक असलेल्या नायलॉन मांजाबाबत पोलिसांनी राज्यभर कोंबिंग ऑपरेशन राबवा, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती वाय. जी. खोब्रागडे यांनी दिले आहेत. ज्या ठिकाणी नायलॉन मांजा आढळून येईल असे दुकान, घर, खाजगी मालमत्ता ही सर्व ठिकाणं सील करावे. लहान मुलांकडे नायलॉन मांजा आढळून आला तर याबाबत माहिती न दिल्यास त्यांच्या पालकांवरदेखील गुन्हा दाखल करावा. ज्या ठिकाणी पतंग उडवण्यात येत असतील त्या सर्व ठिकाणी जाणीवपूर्वक लक्ष ठेवावे. त्यांच्यावर कारवाई करावी असे आदेश खंडपीठानं दिले आहेत. त्याचबरोबर नायलॉन मांजामुळं गळा कापला जात असताना पोलीस आणि प्रशासनानं कठोर कारवाई करावी. औद्योगिक गोष्टींसाठी नायलॉन मान्यता वापर होतो, ही बाब आता चालणार नसल्याचंही खंडपीठानं सांगितलंय.