औरंगाबाद - राज्यातील धार्मिक स्थळे खुली करावीत, या मागणीसाठी आता सर्वच राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. आज भाजपने राज्यव्यापी घंटानाद आंदोलन करत धार्मिक स्थळे सुरू करावीत, अशी मागणी केली आहे. दोन दिवसांपूर्वी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीदेखील धार्मिक स्थळे उघडण्याची मागणी केली होती.
औरंगाबादच्या गजानन महाराज मंदिरासमोर भाजपने घंटानाद आंदोलन केले. 'दार उघड, दार उघड' अशी हाक भाजपकडून देण्यात आली. इतर राज्यांमध्ये धार्मिक स्थळे उघडण्यात आली असताना महाराष्ट्रात भाविकांना देवापासून का दूर ठेवले जाते? असा प्रश्न उपस्थित केला.
भारतीय जनता पक्षातर्फे धार्मिक स्थळे उघडावीत, या मागणीसाठी आज राज्यभर घंटानाद आंदोलन करण्यात आले. औरंगाबाद शहरात १२ ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या अनुषंगाने राज्यात संपूर्ण व्यवहार बंद करण्यात आले होते. मात्र, हळूहळू सर्व व्यवहार पूर्ववत होत असताना मंदिरेच का बंद ठेवली जात आहेत? असा प्रश्न भाजपने उपस्थित केला. दारूची दुकाने उघडली, मांस-मच्छी दुकाने उघडली, सर्व बाजारपेठा उघडण्यात आल्या. इतर राज्यांमध्ये देवस्थाने उघडण्यात आली आहेत, मग महाराष्ट्रातच हा नियम का? हे निजामाचे सरकार आहे काय? असा प्रश्न भाजप आमदार अतुल सावे यांनी केला.
हेही वाचा -चिंताजनक..! गोंदियात वाढतोय कुपोषणाचा आकडा
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हिंदूत्वाचा नारा घेऊन पुढे जातात. त्यांच्या राज्यात वारकरी सांप्रदायावर अन्याय होत आहे. मंदिर बंद असल्याने पूजा करणारे, हार-फुले विकणारे, भजनी मंडळ या सर्वांचे अर्थकारण थांबले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व मंदिरे तातडीने उघडावीत, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. खासदार इम्तियाज जलील यांनी दोन दिवसांपूर्वी मंदिर-मशीद उघडण्याची मागणी केली होती. मात्र, आम्ही एक आठवडा आधीच ही मागणी करून आमचे आंदोलन जाहीर केले होते. त्यामुळे जलील यांच्या मागणीनंतर ही मागणी नसून सर्वात आधी भाजपनेच धार्मिक स्थळे उघडण्याची मागणी केली असल्याचे आमदार अतुल सावे यांनी सांगितले. औरंगाबादच्या गजानन महाराज मंदिर येथे झालेल्या आंदोलनामध्ये खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, जिल्हाध्यक्ष संजय केणेकर उपस्थित होते. प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.