औरंगाबाद -जिल्ह्यात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गांधेली गावात अतिउष्णतेमुळे केळीची बाग सुकली आहे. एवढेच नाही, तर वादळामुळेहे या बागेला फटका बसला आहे.
वाढत्या उन्हामुळे सुकली केळीची बाग दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळामुळे गांधेली येथील सय्यद अख्तर यांची केळीची बाग उधवस्त झाली. सय्यद अख्तर या शेतकऱ्याने दिड एकर शेतात केळीची बाग लावली होती. केळीचे पीक घेण्यासाठी त्यांनी आपल्या बहिनीकडून आणि मित्रांकडून एक लाख २० हजार रुपये उधार घेतले होते. कमी पाण्यात शेती जगावी यासाठी अख्तर यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला हाता.
गेल्या १५ दिवसांपासून उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसवर असल्याने केळीचे पीक सुकत आहे. पाण्याचे योग्य नियोजन करून केळीचे पीक कसेबसे जगवले. ठेकेदार येऊन केळी पाहून गेला सौदा ठरला, १५ दिवसात केळी काढून पैसे येणार आणि उधारी फिटणार म्हणून सय्यद अख्तर आनंदी होते. मात्र रविवारी सायंकाळी अचानक सुसाट वादळी वारा सुटला आणि त्या वादळाने केळीची बाग उध्वस्त झाली. दोन हजार झाडांपैकी अवघी २०० ते २५० झाडे वाचली. आता उसनवारी फेडायची कशी, असा प्रश्न सय्यद अख्तर यांना पडला आहे.
शेतीचे झालेले नुकसान पाहण्यासाठी सरकारी यंत्रणा दोन दिवसांनी जागी झाली. मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी केळीच्या झालेले नुकसानाची पाहणी केली आहे. अंदाजे ६ लाखांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज असून अहवाल शासनाकडे पाठवल्याची माहिती मंडळ अधिकाऱ्यांनी दिली.