छत्रपती संभाजीनगर Bachchu Kadu On Kunbi Maratha : मागील काही दिवसापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यामध्ये शाब्दिक चकमक होत आहे. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी (Kunbi Nondi) बोगस असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला होता. त्यावर ज्यांना शंका असेल त्यांनी स्वतः येऊन तपासणी करावी. जर खोटं आढळून आलं तर माझ्यासह अधिकाऱ्यांना आत टाका, इतकंच नाही तर भर चौकात फाशी द्या, असं मत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केलंय. गावागावात दवंडी देण्याचं काम सुरू आहे, जो अर्ज करेल त्याला आम्ही प्रमाणपत्र देत आहोत. मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यात आतापर्यंत ३१५७६ नोंदी सापडल्या असून २२९० जणांना प्रमाणपत्र वाटप झाल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिलीय.
आंदोलन करू नका असं सांगणार नाही : मुख्यमंत्र्यांसोबत बसून नवीन ड्राफ्ट तयार केला असून जरांगे पाटील यांना दाखवण्यात येईल. आम्हाला विश्वास आहे की, त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे बदल झाले आहेत. त्यात काही किरकोळ सुधारणा झाल्या तसा अध्यादेश काढण्यात येईल. तर पहिल्यापेक्षा मोठ्या प्रमाणात नोंदी सापडल्या आहेत. काही मोडी लिपीत असलेले पुरावे सर्व समाजासाठी उपयुक्त असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलंय. जरांगे यांची भेट घेण्यासाठी बच्चू कडू आणि मंगेश चिवटे हे दोन सदस्य शिष्टमंडळ संभाजीनगरात दाखल झालं आहे. त्यांनी विभागीय आयुक्तांसोबत बैठक घेतली. मराठा आरक्षण आणि तोडग्याबाबत सोमवारी मुख्यमंत्री आणि माझी जवळपास चार तास बैठक झाली. या बैठकीत जरांगेंच्या ज्या काही मागण्या होत्या त्यावर चर्चा झाली. सगेसोयरे या विषयावरही चर्चा झाली आणि त्यातून एक समाधानकारक तोडगा आम्ही आणला आहे. या तोडग्यामुळं जरांगे यांच्या समाधान होईल. त्यांनी आंदोलन मागे घ्यावं असं काही सांगणार नाही. सोबतच प्रमाणपत्र वाटपासाठी ज्या काही अडचणी होत्या, त्या विभागीय आयुक्तांसोबत बैठक घेऊन दूर करत आहोत. प्रमाणपत्र वाटपासाठी कॅम्प उघडण्यात येतील आणि जरांगे यांच्या जवळपास सर्व मागण्या पूर्ण करण्यात येतील, असंही बच्चू कडू यांनी सांगितलंय.