औरंगाबाद - परतीच्या पावसामुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात ७५ टक्के पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाला प्राप्त झाला आहे. राज्यात मराठवाड्यात बाजरी, मका, कापूस, सोयाबीन या पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांना दोन दिवसात पंचनामे करून घेण्याचे आदेश दिले असल्याची माहिती राज्याचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी औरंगाबादेत दिली.
पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबतची आढावा बैठक महायुतीला जनतेने जनाधार दिलेला आहे. एका दिवसात शिवसेना- भाजपमधील सर्व प्रश्न सुटतील. युती तुटावी म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीने देव पाण्यात ठेवले आहेत. मात्र युती तुटणार नाही. राज्यात सरकार महायुतीचेच येईल, असा विश्वास बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला.
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील १७३ गावांसाठी वॉटर ग्रीड योजना, परतूर औद्योगिक विकास क्षेत्र आदी कामांचा आढावा आज औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये घेतला. तसेच कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱयांना दिल्या.
पालकमंत्री लोणीकर यांच्या संकल्पनेनुसार जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा व जालना तालुक्यातील 176 गावांना ग्रीड पद्धतीने पाणीपुरवठा करण्याची योजना तयार करण्यात आली होती. परंतू यानंतर परतूर मतदारसंघातील 92 गावांची ग्रीड पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. या योजनेतील बऱ्याच गावांची पाईपलाईन व १७६ गावांच्या ग्रीड योजनेची पाईपलाईन एकमेकांना समांतर येत असल्यामुळे पाइपलाइनची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दोन्ही योजना आता सुधारित केलेल्या आहेत. त्यानुसार काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना लोणीकर यांनी दिल्या.