परभणी - जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP ) आमदार बाबाजानी दुर्रानी (Babajani Durani) यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी पक्षाअंतर्गत राजकारण आणि गटबाजीला कंटाळून राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मागील आठवड्यातच आमदार दुर्रानी यांनी पक्षश्रेष्ठींकडे दिलेला हा राजीनामा आज बुधवारी (24 नोव्हेंबर) रोजी मंजूर करण्यात आल्याने या संदर्भात सुद्धा चर्चा होताना दिसत आहे.
आमदार बाबाजानी दुर्रानी यांचा राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा
आमदार बाबाजानी दुर्रानी (Babajani Durani) काही दिवसांपासून पक्षातील स्थानिक नेत्यांबाबत नाराज होते. पक्षातील अंतर्गत वाद आणि गटबाजीला ते कंटाळले होते. म्हणून दुर्रानी यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा (NCP Parbhani District President) राजीनामा दिला आहे.
स्थानिक नेत्यांशी होते वाद -
आमदार बाबाजानी दुर्रानी काही दिवसांपासून पक्षातील स्थानिक नेत्यांबाबत नाराज होते. पक्षातील अंतर्गत वाद आणि गटबाजीला ते कंटाळले होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार तथा माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश विटेकर यांच्या सोनपेठ येथील बाजार समितीच्या व्यवसायिक गाळ्यांच्या बांधकामाविरोधात आमदार दुर्रानी यांनी तक्रार केल्याने वादाची ठिणगी पडली. त्यानंतर पक्षात सरळसरळ दोन गट निर्माण झाले. विशेषतः दुसऱ्या फळीतील नेत्यांशी त्यांचे वाद निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. यातूनच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येते. या संदर्भात आमदार दुर्राणी यांच्याशी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
स्थानिक निवडणुकांवर होणार परिणाम -
येत्या काळात जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. आणि त्यापूर्वीच बाबाजानी दुर्रानी यांनी राजानामा दिल्याने पक्षासाठी हा एक झटका असल्याचे बोलले जात आहे. बाबाजानी दुर्रानी हे विधानपरिषदेचे आमदार असून त्यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे मागील आठवड्यातच सोपवला होता. आता हा राजीनामा मंजूर केल्यामुळे येत्या निवडणूकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वीच झाली मारहाण -
आमदार दुर्रानी यांना एका व्यक्तीने मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. मारेकरी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने 'जवळ बंदूक असती तर गोळ्या घातल्या असत्या', असे म्हणत आमदाराला जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली असून, मोहम्मदबीन सईदबीन किलेब असे नाव असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
अंत्यविधीच्या कार्यक्रमात घडली घटना -
मागील आठवड्यातील गुरुवारी दुपारी आमदार बाबाजानी दुर्राणी हे शहरातील एका अंत्यविधीच्या कार्यक्रमास गेले होते. येथे शोकाकुल वातावरणात ते सहकाऱ्यांशी बोलत होते. त्यावेळी पाथरीच्या अजिज मोहल्ला भागात राहणारा मोहम्मदबीन सईदबीन किलेब हा तेथे आला आणि त्याने थेट अश्लील शिवीगाळ करत आमदार दुर्राणी यांच्या कानशिलात लगावल्या.