औरंगाबाद- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मजुरांचे हाल होत आहेत. त्यांच्याकडे राज्य आणि केंद्र सरकार लक्ष द्यायला तयार नसल्याने आयटकच्यावतीने कामगारांचा देशव्यापी निषेध दिन पाळण्यात आला. यावेळी कामगारांनी आपल्या घरासमोर उभे राहून मूक निदर्शने केली.
केद्रीय कामगार संघटनासह आयटक संलग्न महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना, शहीद भगत सिंह हाॅकर्स युनियन, घरेलू कामगार संघटना, लाल बावटा रिक्षा युनियन व ऑल मराठवाडा कामगार युनियन तर्फे कामगारांनी आपल्या घराबाहेर येऊन मूक निदर्शने केली. देशव्यापी निषेध दिनअंतर्गत औरंगाबादेत रिक्षावाले, घरकाम करणाऱ्या महिला, कारखान्यातील कामगार, कंत्राटी कामगार, फेरीवाले यांनी मागणी कागदावर लिहून, तोंडाला मास्क लाऊन घरासमोरील रस्त्यावर उभे राहून मूक निदर्शने केली.
लॉकडाऊनमध्ये कामगार, कष्टकरी, स्थलांतरित कामगार, व्यवसायिक, शेतकरी हे सर्व अडचणीत असताना केंद्र व राज्य सरकारने त्यांना आर्थिक मदत केली नाही. लॉकडाऊन काळातील वेतन कामगारांना द्यावे तसेच कोणतीही कामगार कपात करण्यात येऊ नये, असे आदेश असतानाही बहुसंख्य उद्योगांनी कायम कामगार व कंत्राटी, हंगामी कामगारांना वेतन दिले नाही. रोजचे उत्पन्न बंद झालेल्या गोरगरीब, कष्टकरी व स्थलांतरित कामगारांना व गरजूंना सरकारी गोदामात प्रचंड अन्नधान्य साठा असूनही पुरेसे व वेळेवर अन्न धान्य दिले नाही. त्यामुळे श्रमिक व गरीब माणसे उपासमारीला तोंड देत आहेत. पंतप्रधानांनी जाहीर केलेले 20 लाख कोटींचे पॅकेज फसवे असून त्यात अडचणीत असलेल्या कामगार, कष्टकरी, शेतकरी, असंघटित श्रमिक, यांना कुठलीही थेट मदत केलेली नाही. असा आरोप कम्युनिस्ट नेते अॅड. अभय टाकसाळ यांनी केला.