औरंगाबाद- कन्नड तालुक्यातील पिशोर-नाचनवेल बाबरा रस्त्यावर दांम्पत्याला अडवून मंगळसूत्र चोरल्याची घटना घडली आहे. शेख लतीफ रशीद (राहणार पिशोर) असे चोराचे माव असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले आहे.
चोरट्याला पकडण्याचा थरार कॅमेऱ्यात कैद जगन साहेबराव ठोकळ (रा.माळेगाव ठोकळ) पत्नीसह दुचाकीवरुन जात असताना डोंगरगांव शिवारात एका अनोळखी व्यक्तीने त्यांना आडवले. यानंतर त्याने चाकूचा धाक दाखवून मारहाण केली; आणि पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र घेऊन पोबरा केला. या मारहाणीत जगन ठोकळ यांचा पाय फ्रॅक्चर झाला.
प्रसंगी आरडाओरड केल्याने शेजारील शेतकरी धावत आले व त्यांनी चोरटयाचा पाठलाग केला. यादरम्यान संबंधित चोर तलावातील झुडूपात लपल्याची माहिती स्थानिकांना मिळाली. डोंगरगावचे सरपंच गजानन म्हस्के यांनी पिशोर पोलीस ठाण्याला याबाबत कळवले. यानंतर उपनिरीक्षक एन.वाय.अंतरप, पोना बोराडे, देशमुख या पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली; व आरोपीला ताब्यात घेतले.
या आरोपीवर विविध पोलीस ठाण्यांत चोरीचे गुन्हे दाखल असून तो सध्या तडीपार असल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमी जगन ठोकळ यांच्या जबाबानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सह पोलीस निरिक्षक जगदीश पवार यांनी दिली आहे.