औरंगाबाद- एसएससी बोर्डाच्या गलथान कारभारामुळे एका मुलीचे शैक्षणिक नुकसान होत, असल्याचे समजताच विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी बोर्डाचे कार्यालय गाठून संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच ते यावेळी बोर्डात 2 तास ठिय्या मांडून होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणारे बोर्डाचे नवे नियम तात्काळ बदला, अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे करणार असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
दहावीच्या मुलीसाठी विधानसभा अध्यक्षांचा बोर्डात ठिय्या औरंगाबाद तालुक्यातील साजंखेडा येथील अंजली भाऊसाहेब गवळी या विद्यार्थीनीचा पेपरमधील काही पाने फाडल्यामुळे निकाल राखीव ठेवला होता. तसेच पेपर देणाऱ्या विद्यार्थिनीने पाने फाडल्याचा दावा बोर्डांतील अधिकाऱ्यांनी केला होता. यामुळेच अंजलीचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. याप्रकरणी अंजलीने बोर्डात तक्रार करून पाने आपण फाडली नसल्याचे लेखी स्पष्टीकरणही दिले होते. तरीही तिचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता.
याविषियी 29 जूनला सुनावणी झाली. यावेळीही अंजलीने उत्तरपत्रिकेतील पाने फाडले नसल्याचा दावा केला होता. त्यानंतरही बोर्डाने तिचा निकाल राखीव ठेवल्यामूळे अंजलीने वडिलांसह विधानसभा अध्यक्षांची भेट घेत आपली कैफियत मांडली. यानंतर बागडे यांनी बोर्डातील अधिकाऱ्यांना बोलतो, असे अंजलीच्या वडिलांना सांगितले.
त्यानंतर बागडे यांनी 4 वाजण्याच्या सुमारास थेठ एसएससी बोर्ड गाठले. शिक्षण सचिव सुगाता पुन्ने आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, उत्तर पत्रिकेचे पान फाडले असल्यामुळे आणि विद्यार्थिनीने कबुली दिल्यामूळे निकाल राखीव ठेवल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा बागडे यांनी उत्तरपत्रिका दाखविण्याची मागणी केली. मात्र, नियमानुसार उत्तरपत्रिका देता येत नसल्याचे कारण दिल्यानंतर जोपर्यंत उत्तरपत्रिका मिळत नाही, तोपर्यंत उठणार नाही, अशी भूमिका बागडे यांनी घेतली होती. त्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.