औरंगाबाद - 'तू काय बागेचा मालक आहे का'? असे म्हणत महापालिकेच्या जांभूळ उद्यान येथील सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून हर्सूल पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महापालिकेच्या जांभुळवन उद्यान येथील आमराईमध्ये सुरक्षारक्षक म्हणून राजू दादाराव गायकवाड (४१, रा. हितोपदेश हाऊसिंग सोसायटी, जटवाडा रोड) काम करतात. आज दुपारी बाराच्या सुमारास मनोज देविदास सुतारे (३२, रा. राजनगर) हा व्यक्ती कुणालाही न विचारता उद्यानातील कैऱ्या तोडण्यासाठी बागेत गेला. यावेळी सुरक्षा रक्षक गायकवाड यांनी त्याला कैऱ्या तोडण्यास विरोध केला. त्यावरून सुतारे याने सुरक्षारक्षक गायकवाड यांच्याशी वाद घालत, त्यांना 'तू काय बागेचा मालक आहे का'? अशी उध्दट भाषेत आरेरावी केली. दरम्यान, गायकवाड या व्यक्तीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांचे काहीही समजून न घेता, सुतारे याने गायकवाड यांची गचांडी धरुन हे आंब्याचे झाडच तोडतो, असे म्हणत त्यांच्या अंगावर धावून गेला. या सर्व प्रकरणानंतर गायकवाड यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या या तक्रारीवरून सुतारे विरुध्द हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -चालत्या फिरत्या शाळेतून ज्ञानार्जन करणारे शिक्षक चंद्रहास श्रीवास्तव
हेही वाचा -स्वतंत्र सोशल मीडिया यंत्रणेची गरज नाही, शासन निर्णय रद्द करण्याचे अजित पवारांचे आदेश