औरंगाबाद - शहरात एसटीने प्रवास करून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची आता अँटीजेन तपासणी करण्यात येत आहे. शहरातील मुख्य बसस्थानकावर दुपारी या मोहिमेला सुरूवात करण्यात आली. महत्वाचे म्हणजे पहिल्या दिवशी जवळपास आठ ते दहा नवीन रुग्ण या तपासणी मोहिमेत आढळून आले आहेत. या संदर्भात मुख्य बसस्थानकावरून आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी...
औरंगाबादमध्ये मोठ्या संख्येने कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत आहेत. रुग्ण संख्येने वीस हजारांचा टप्पा पार केला आहे. कोरोनाचे रुग्ण लवकर समोर यावेत याकरिता, शहरात विविध नवे प्रयोग राबवण्यात येत आहेत. त्यामध्ये आता बसने प्रवास करून शहरात दाखल होणाऱ्या प्रवाशांची अँटीजेन तपासणी सुरू करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने आंतरजिल्हा एसटीचा प्रवास करता येईल, असे आदेश जाहीर केले. त्यानंतर गुरुवारी सकाळपासून राज्यात बस सेवा सुरू करण्यात आली.
एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जात असताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत आहे. मात्र बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी मात्र करण्यात येत नाही. त्यामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होण्याची भीती निर्माण झाली होती. त्यावर औरंगाबाद महानगरपालिकेकडून या प्रवाशांची अँटीजेन तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शनिवारी दुपारपासून बसने प्रवास करून शहरात दाखल होणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरू करण्यात आली. महत्वाचे म्हणजे, पहिल्या दिवशी जवळपास आठ ते दहा नवीन रुग्ण या तपासणी मोहिमेत आढळून आले आहेत.