औरंगाबाद - जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहायला आलेल्या अमेरिकन दुतावासातील पर्यटकांना वेळेवर बस मिळाली नाही. यामुळे त्यांना चक्क दिडतास उभे रहावे लागल्याची माहिती आहे.
अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या अमेरिकन पर्यटकांचे हाल; पर्यटक संख्या घटण्याची भीती
जगप्रसिद्ध अंजिठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या अमेरिकन दुतावासातील पर्यटकांचे हाल झाल्याची माहिती आहे.
औरंगाबादची अजिंठा लेणी ही जगप्रसिद्ध वारसा मानला जातो. ही लेणी पाहण्यासाठी देशातूनच नव्हे तर विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक अजिंठ्यात येत असतात. मात्र, पर्यटकांना मिळणाऱ्या सुविधा कमी असल्याने अनेकवेळा पर्यटकांना त्रास सहन करावा लागतो. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. अमेरिकन दूतावासातील 35 ते 40 पर्यटक लेणी पाहण्यासाठी आले होते. मात्र, त्यांना वातानुकूलित बस नसल्याने दीड तास ताटकळत उभे राहावे लागल्याची माहिती आहे. लेणी परिसरात पाच किलोमीटर अंतर चालत जाण्यासाठी बस स्थानकापासून वातानुकूलित आणि पर्यावरण पूरक पाच बसेस कार्यान्वित आहे. मात्र, त्यापैकी तीन बस नादुरुस्त असल्याने दोनच बसवर काम भागावले जात आहे. याचाच फटका अनेक पर्यटकांना बसत असल्याने लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती आहे. दरम्यान, याचा परिणाम पर्यटक संख्येवर होण्याची भीती व्यक्त जात आहे.