औरंगाबाद - राज्यभरात आजपासून जिम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र औरंगाबादमधे अद्याप जिम सुरू झालेल्या नाहीत. महानगर पालिका आणि पोलीस आयुक्तालय यांच्याकडून अद्याप सूचना नसल्याने जिम सुरू झाल्या नाहीत, असे जिम चालकांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले.
दसऱ्यानंतर जिम सुरू होतील, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. दिलेल्या नियमानुसार जिम चालकांनी आपले साहित्य सॅनिटायजेशन आणि इतर तयारी केली आहे. राज्य सरकारच्या आदेशानंतर काही प्रमाणात जिम सुरू झाल्या आहेत. विशेषतः ग्रामीण भागांमध्ये जिम सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र शहरी भागात असलेल्या जवळपास 250 ते 300 जिमपैकी काही जिम चालक मनपाच्या आदेशाची आणि नियमावलीची वाट पाहत आहेत.
जिमसह साहित्याचे सॅनिटायजेशन -
मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता जिम बंद ठेवण्याचे आदेश केंद्र आणि राज्य सरकारने दिले होते. एक महिन्याआधी केंद्र सरकारने जिम सुरू करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी राज्यातील परिस्थिती पाहता जिम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र दसऱ्यापासून जिम सुरू करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्यानंतर जिम चालकांनी आठ महिन्यांपासून बंद असलेल्या जिमची स्वच्छता आणि सॅनिटायजेशन करून घेतले.