औरंगाबाद - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही क्षणी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करतील, अशी माहिती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली होती. त्यावर एमआयएम तर्फे टीका करण्यात आली आहे. मागील तीस वर्षांपासून एकच मुद्दा घेऊन बसले आहेत, विकासाबाबत बोला, अशी टोलेबाजी खासदार इम्तियाज जलील यांनी केली.
औरंगाबाद शहराला ऐतिहासिक वारसा आहे. मात्र, या शहराची ओळख पुसत चालली आहे. कचरा आणि खड्ड्यांचे शहर म्हणून शहराला ओळख मिळत आहे. शहराचे नाव बदलण्याची भाषा शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. देशात ज्या शहरांची नावे बदलली त्या शहरांचा विकास किती झाला हे तपासा, शहराचे बदललेले नाव नागरिकांना नको आहे. शहराचे काय?, कचरा कधी स्वच्छ होणार?, शहरासाठी जाहीर केलेली पाण्याची योजना कधी पूर्ण होणार? असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे आधी शिवसेनेने द्यावीत.