औरंगाबाद - सिल्लोडच्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे काँग्रेसच्या अब्दुल सत्तार यांचे मंत्रिपदाचे स्वप्न भंगले आहे. अब्दुल सत्तार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवताच भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रवेशाला जाहीर विरोध केला. त्याचबरोबर भाजप पधाधिकाऱ्यांनी मुंबईसह दिल्लीमध्ये आपला विरोध दर्शवून सत्तार यांच्या मंत्रिपदाचा मार्ग अवघड केल्याची सध्या सगळीकडे चांगलीच चर्चा रंगली आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळेच अब्दुल सत्तारांचे हुकले मंत्रिपद सिल्लोडचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी लोकसभेत काँग्रेसची साथ सोडली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वाढलेल्या भेटीगाठींमुळे राधाकृष्ण विखे पाटीलांसोबत सत्तार देखील भाजपवासी होतील, अशी खात्रीलायक माहिती समोर आली होती. मात्र, या पक्ष प्रवेशाला सिलोडच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता.
लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यातील राजकारणात वेगळ्याच हालचाली दिसून आल्या. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस पक्षाची साथ सोडत काँग्रेस विरोधी प्रचार केला. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अब्दुल सत्तार यांच्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या सुरु झालेल्या भेटी गाठींनी अब्दुल सत्तार लवकरच भाजपवासी होणार, असे बोलले जात होते. मात्र, सत्तार यांना भाजपमध्ये घेण्यास भाजपचे बडे नेते तयार असले तरी सिल्लोड विधानसभा मतदार संघातील भाजप पदाधिकाऱ्यांनी सत्तार यांना पक्षप्रवेश देऊ नये, अशी मागणी केली. इतकेच नाही तर सिल्लोड तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत सत्तार यांचा विरोध केला.
सत्तार भाजपमध्ये आले तर आम्ही राजीनामा देऊ, असा पवित्रा पदाधिकाऱ्यांनी घेतला होता. त्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेऊन आपला विरोध दर्शवला, या दबाव तंत्रामुळेच सत्तार यांचा भाजप प्रवेश आणि मंत्री पद रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता सत्तार यांचा भाजप प्रवेश करायचा कसा? असा प्रश्न पक्षातील नेत्यांना पडला आहे. त्यामुळे सत्तार यांच्या माध्यमातून मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्याच्या रणनीतीत भाजपला बदल करावा लागू शकतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.