औरंगाबाद- शिवसैनिकांच्या एका बाणाने विरोधकांचे तीन तेरा वाजवले, अशी प्रतिक्रीया अब्दुल सत्तार यांनी दिली. सिल्लोड मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन विरोध करूनही सिल्लोड मतदार संघात अब्दुल सत्तार यांनी सत्ता अबाधित ठेवण्यात यश मिळवले आहे. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उघडपणे विरोध करत प्रभाकर पालोदकर यांना पाठिंबा दिला होता.
अब्दुल सत्तारांची विजयानंतर प्रतिक्रीया सर्व विरोधकांचा विरोध मोडीत काढत सिल्लोड मतदारसंघात शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांनी 1लाख 23883 मते घेतली तर प्रभाकर पालोदकर यांना 99000 मते मिळाली. येथे शेवट पर्यंत चुरस होती पण आब्दूल सत्तार यांनी एकहाती विजय मिळवला. यावेळी शिवसेनेचे विजयी उमेदवार अब्दुल सत्तार यांनी जनतेचे आभार मानले यानंतर शिवसेनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस सोडल्यानंतर त्यांना भाजपात प्रवेश करायला भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. मात्र,अब्दुल सत्तार यांनी धक्कातंत्र वापरत शिवसेनेत प्रवेश केला. अब्दुल सत्तार यांच्यासाठी भाजपने सिल्लोडची हक्काची जागा शिवसेनेला सोडल्याने सिल्लोड येथील भाजप पदाधिकारी संतप्त झाले होते.
भाजप पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रभाकर पालोदकर यांना अपक्ष लढल्यास भाजपचा पाठिंबा राहील असे सांगितले होते. त्याबाबत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांना पाठिंबा दिला. प्रभाकर पालोदकर यांनी काँग्रेस तर्फे मिळालेली उमेदवारी सोडून अपक्ष अर्ज भरला.यामुळे सिल्लोड मतदारसंघात मोठी काटे की टक्कर होती. सत्तार यांच्या उमेदवारी दिल्याने नाराज झलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी युतीधर्म सोडून पालोदकर यांचा प्रचार केला. त्यामुळे सत्तार यांना निवडणूक जड जाईल, असे वाटत असताना अब्दुल सत्तार यांच्या रणनीतीमुळे त्यांना विजय मिळवणे सोपे गेले.