औरंगाबाद- पैठण येथील शेवगाव रोडवर भरधाव मारुती कार व मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात मोहटा देवीचे दर्शन करून पैठणकडे निघालेल्या मोटारसायकलवरील एका ७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर, अन्य तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी रात्री औरंगाबादला हलविण्यात आले आहे.
रविवारी सायंकाळी रहाटगाव (ता. पैठण) येथील दिपक प्रल्हाद फासाटे (वय.२४) हे आपले नातेवाईक आशाबाई प्रल्हाद फासाटे (वय.४६), पूजा रमेश फासाटे (वय. १०) व श्रेया रामनाथ सातपुते (वय. ७ वर्ष रा. सालवडगाव ता. पैठण) असे चौघेजण मोहटा देवीच्या दर्शनासाठी शनिवारी सकाळी मोटारसायकलने गेले होते. दर्शन करून परत येताना सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांची मोटारसायकल क्रं (एम.एच. २० ई.एन ०२९९) व पैठणकडून येणारी पांढऱ्या रंगाची सुझुकी सियाझ मारुती कार क्र.(ए.एच. १७, ४४८०) ही दोन्ही भरधाव वाहने खुले कारागृहासमोरच्या वळण रस्त्यावर एकमेकांवर अदळली. या घटनेत मोटारसायकलवरील चौघांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली.