औरंगाबाद - तब्बल पाच किलो बनावट सोने बँकेत तारण ठेवून एक कोटी पाच लाखांचे कर्ज उचलल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी गंगाधर नाथराव मुंडे, मंगेश नाथराव मुंडे आणि दिगंबर गंगाधर डहाळे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तारण म्हणून बँकेत ठेवले ५ किलो बनावट सोने; बँकांना कोटीचा गंडा महाराष्ट्र ग्रामीण बॅंक आणि अहमदनगर को-ऑपरेटीव्ह बॅंकेतील दोन संशयित खात्यांची माहिती मिळाल्यानंतर गुन्हेशाखेने बॅंकेला सोने पडताळणी करायला सांगितले. तारण ठेवलेल्या दागिन्यांचे व्हिडिओ कॅमेऱ्याच्या निगराणीत दोन पंचासमक्ष परीक्षण करण्यात आले. त्यावेळी जे दागिने तारण ठेवून कर्ज घेण्यात आले होते, ते दागिने बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा -'मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी अगोदर केंद्रात बिल मंजूर करा'
औरंगाबाद शहराच्या खडकेश्वर येथील अहमदनगर को-ऑपरेटीव्ह बॅंकेत गंगाधर मुंडे, मंगेश मुंडे, दिगंबर डहाळे यांनी 2 किलो 590 ग्रॅम बनावट सोने तारण ठेवून 56 लाख 50 हजार 558 रुपयांचे कर्ज उचलले होते. तर समर्थनगर येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेत गंगाधन मुंडे व मंगेश मुंडे यांनी 2 किलो 609. 55 ग्रॅम सोने तारण ठेवून 48 लाख 57 हजार 927 रुपयांचे कर्ज उचलल्याचे समोर आले. हे दागिने प्रमाणित करून देणाऱ्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. याप्रकरणी औरंगाबाद शहर गुन्हे शाखेचे प्रमुख मधुकर सावंत यांनी ही कारवाई केली.