अमरावती- दुष्काळामुळे पाणीटंचाईचा वणवा पेटला आहे. त्यामुळे नागरिकांसह जनावरांनीही पिण्यास पाणी मिळणे कठीण झाले आहे. मात्र गावातील तरुण विकत पाणी आणून नागरिकांची तहान भागवत आहे. स्वप्निल सुरोशे असे त्या जलदाता तरुणाचे नाव आहे. त्याच्या या उपक्रमामुळे नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
दुष्काळामुळे गावागावात पाण्यासाठी वणवा पेटल्याने एक ड्रम पाण्यासाठी 50 ते 60 रुपये मोजावे लागतात. त्याच गावात आज स्वप्निल सुरोशे हा जलदाता तरुण दरोरोज 3 हजार रुपये खर्च करून विकत पाणी आणतो. ते अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील आठ हजार लोकसंखेच्या शिरखेड गावाला मोफत पाणी देऊन नागरिकांची तहान भागवतो.
अमरावती जिल्ह्याला सध्या दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. रणरणत्या उन्हात नागरिकांसह अबालवृद्धांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मोर्शी तालुका हा ड्रायझोन परिसर असल्याने येथील पाणीबाणीचा विचारही न केलेलाच बरा. त्यामुळे 8 ते 10 दिवसाआड नळ येतो, तोही काही वेळच. मुबलक पाणी मिळत नसल्याने महिलांना सरकारी विहिरीवर पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. परंतु स्वप्नीलने सुरू केलेल्या मोफत पाणीवाटपामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे.