अमरावती - खासगी रुग्णालयांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा अनावश्यक वापर होता कामा नये, रेमडेसिवीर उपलब्धता व नियंत्रणासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. मात्र, गरज नसेल तिथे अवाजवी वापर होणे चुकीचे आहे. याबाबत शासनाने वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सर्व रूग्णालयांकडून पालन व्हावे, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.
जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांतील स्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, उपजिल्हाधिकारी राम लंके यांच्यासह अनेक डॉक्टर उपस्थित होते.
रुग्णांच्या नातेवाईकांचे समुपदेशन करा -
कोरोना उपचारात रेमडेसिवीर हाच एकमेव रामबाण उपाय समजून खासगी डॉक्टर त्याचा अवाजवी वापर करत असल्याच्या तक्रारी येत आहेत. ते तत्काळ थांबावे. गरज नसलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडूनही रेमडेसिवीरची मागणी होत असेल तर डॉक्टरांकडून त्यांचे समुपदेशन झाले पाहिजे. सर्व रुग्णालयांना गरजेनुसार इंजेक्शन, ऑक्सिजन आदी बाबी उपलब्ध करून दिल्या जातील. रेमडेसिवीर, ऑक्सिजन, लस आदी सर्व बाबींची कमतरता भासू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. मात्र, महामारीच्या या काळात आवश्यक तिथेच औषधांचा वापर, अवाजवी वापर टाळणे, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व रुग्णालयांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.