अमरावती- चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या भिवापूर येथे एका घरात धाड टाकून ४ मृत सायळ जप्त करण्यासोबत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणातील ३ आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले. ही कारवाई चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या माळेगाव वर्तुळातील कर्मचाऱ्यांनी केली.
अमरावतीच्या भिवापूर येथे वन्यप्राण्यांची तस्करी; ४ मृत सायळ जप्त, एका आरोपीस अटक
चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या माळेगाव वर्तुळातील कर्मचाऱ्यांनी भिवापूर येथे एका घरात धाड टाकून ४ मृत सायळ जप्त करण्यासोबत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मौजा भिवापूर येथे वन्यप्राण्याची शिकार झाली. याबाबत प्राप्त झालेल्या गुप्त माहितीवरून माळेगाव वर्तुळच्या वनपालांनी पथक तयार करून मौजा भिवापूर येथील आरोपी विशाल किसन राठोड याच्या घराची झाडाझडती घेतली. यावेळी घरामध्ये मृतावस्थेतील ४ वन्यप्राणी सायळ आढळून आले. त्यामुळे सदर आरोपीस अटक करण्यात आले.
दरम्यान, यावेळी या गुन्ह्यामध्ये त्याच्यासोबत सामाविष्ट असलेले गोकुल रामदास चव्हाण, दिनेश भाऊराव चव्हाण, मंगल देविदास जाधव हे ३ आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. आरोपीच्या घरातून मृत ४ वन्यप्राणी ताब्यात घेऊन जप्तीनामा व पंचासमक्ष आरोपीचे घरी मौका पंचनामा नोंदविण्यात आला. तसेच आरोपी विशाल किसन राठोडला चौकशीकामी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ५० अन्वये अटक करण्यात आली. तर सदर गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम नुसार गुन्हा नोंदविण्यात आला.