मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या घटनेविषयी बोलताना संगीता ठाकरे अमरावती:मणिपूर येथे महिलांवर झालेल्या अत्याचाराचा दुर्दैवी प्रकार समोर आला असताना देखील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत दुःखाचा आव आणणाऱ्या भाजपच्या चित्रा वाघ या आता गप्प का आहेत? असा सवाल अमरावती जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने उपस्थित करण्यात आला. मणिपूर येथील दुर्दैवी घटनेचा निषेध आज (रविवारी) राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने अमरावती शहरातील इर्विन चौक येथे करण्यात आला. या निषेध सभेत शहरातील विविध महिला संघटना देखील सहभागी झाल्या.
पंतप्रधानांचाही केला निषेध:राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे यांच्या नेतृत्वात इर्विन चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर केंद्र शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. मणिपूर येथे महिलांवर होत असलेल्या अत्याचाराचा गंभीर व्हिडिओ हा 70 दिवसानंतर समोर आल्यावर तेथील गंभीर परिस्थिती संपूर्ण देशाला कळली. असे असताना या घटने संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात कारवाई केल्या जाईल, केवळ इतक्यात शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली. एकूणच सध्याच्या परिस्थितीत केंद्र सरकार देखील महिलांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात गंभीर नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली.
महिला आयोगावरही ताशेरे:मणिपूर येथील घटने संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ एका शब्दात प्रतिक्रिया दिली. आज अडीच तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये परिस्थिती गंभीर असून त्या ठिकाणी महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहे. महिला आयोग देखील या गंभीर प्रकरणात काहीच बोलत नसल्याने महिला आयोगाच्या कार्यप्रणाली बाबत देखील राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने शंका व्यक्त करण्यात आली. देशात इतकी गंभीर घटना घडते आणि सारेच गप्प कसे बसतात, याबाबत आम्हाला प्रश्न पडला असल्याचे आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी म्हटले.
तर सरकार बदलणार:महिलांवर इतका प्रचंड अत्याचार घडत असताना सरकार गप्प बसले आहे. देशातील महिला या अत्याचारा विरोधात एकत्र आल्या तर देशातील हे असंवेदनशील सरकार निश्चितच बदलणार, असा विश्वास देखील यावेळी संगीता ठाकरे यांनी व्यक्त केला. यापुढे जे सरकार महिलांना न्याय देईल, महिलांचा आदर सन्मान राखेल त्यांनाच महिला निवडून देतील असे देखील संगीता ठाकरे म्हणाल्या.
हेही वाचा:
- Manipur Violance : मणिपूर घटनेचा निषेध; ठाण्यात स्वतःचे केस कापून महिलांचे आंदोलन
- pune congress protest: पुण्यात मणिपूर घटनेवरून काँग्रेसचे आंदोलन; यांचा केला निषेध
- Manipur Women : मणिपूर प्रकरणावर काँग्रेसच्या महिला आमदार संतप्त, पावसाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक