अमरावती - मोर्शी महामार्गावर पिंगळादेवी गडाच्या पायथ्याशी असलेल्या मोर्शी तालुक्यातील गोराळा गावात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शेजार धर्म निभावणाऱ्या महिला आज एकमेकींविरोधात पाण्यासाठी नळावर भांडताना पाहायला मिळत आहेत. गावात सात दिवसांच्या अंतराने पाणी पुरवठा होतो. जनावरांना पाणी प्यायला मिळावे म्हणून येथील शेतकरी गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदुरा गावात दिवसातून दोन वेळा जनावरांना पाणी पाजण्यासाठी नेतात.
मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणातून जाणाऱ्या पाईपलाईनच्या ओवरफ्लोवर सकाळपासूनच येथील नागरिकांची पाण्यासाठी गर्दी दिसते. त्यातही ते पाणी गढूळ असल्याच्या महिलांच्या तक्रारी आहे. गावात सात दिवसानंतर पाणी येते. भरून ठेवलेले पाणी तीन दिवसातच संपते. त्यामुळे पाण्यासाठी महिलांना पुन्हा संघर्ष करावा लागत आहे.