अमरावती- स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांच्या पत्नी व अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या समोर भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी दोन्ही हात जोडून आदरपूर्वक वाकून नमस्कार केला आहे. या घटनेचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे, भाजप जिल्ह्याध्यक्ष सुर्यवंशी यांना नेटकऱ्यांनी पुन्हा ट्रोल केलं आहे.
अमरावतीच्या स्थानिक राजकारणात भाजप आणि आमदार रवी राणा यांच्यातील अंतर्गत वैर संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. गतवर्षी पालकमंत्री प्रवीण पोटे आणि आमदार रवी राणा यांच्या वादात भाजप जिल्हाध्यक्ष सूर्यवंशी यांनी उडी घेत थेट आमदार रवी राणा यांच्याशी वाद ओढून घेतला होता. ज्यानंतर अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत नवनीत राणा यांना पराभूत करण्यासाठी भाजपने जंग जंग पछडल्याचे बोलले जाते.
परंतु ज्या नवनीत राणांना पराभूत करण्याच्या हेतूने भाजपने दिवसाची रात्र केली. त्याच नवनीत राणांसमोर भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिनेश सुर्यवंशी यांनी कंबरेपासून वाकत आदरपूर्वक दोन हात जोडून नमस्कार केल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे सुर्यवंशी पुन्हा एकदा समाज माध्यमावर चांगलेच ट्रोल झाले आहेत. या फोटोत रिपाइंचे राजेंद्र गवई आणि काँग्रेसचे सुरेश रतावा दिसत आहेत. या फोटोवर समाज माध्यमातून चांगलीच टीका टिप्पणी होत आहे.
राजकारणात कायमस्वरूपी कोणीच कोणाचा शत्रू आणि मित्रही नसतो. कदाचित हा फोटो जुनाही असू शकतो. पण व्हायरल झालेला हा फोटो मात्र सध्या चर्चेचा विषय बनला आहे. याआधी दोन दिवसांपूर्वीच व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपने अमरावती जिल्ह्यात खळबळ उडवून दिली होती. तो वाद शांत झाला असतानाच आता या फोटोने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. मात्र आता दिनेश सुर्यवंशी या फोटोवर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.