अमरावती -कोरोना लसीकरण मोहिमेंतर्गत कोरोना योद्ध्यांनंतर 1 मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना लसीकरण सुरू झाले असताना दुसऱ्याच दिवशी सर्व्हर डाऊन झाल्याने अमरावती शहरातील जिल्हा रुग्णालयातील परिचारिका महाविद्यालय या लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांवर ताटकळत राहण्याची वेळ आली. या प्रकरामुळे वृद्धांसह त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांनी रोष व्यक्त केला.
लसीकरणाचे काम बंद
ज्येष्ठ नागरिकांना लस घेण्यासाठी कोविन अॅपवर नोंदणी करावी लागते. तसेच लसीकरण केंद्रांवर सुद्धा नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लसीकरण मोहीम गतीने व्हावी यासाठी आशा वर्करकडून ज्येष्ठ नागरिकांची माहिती संकलीत केली जात आहे. असे असताना आज परिचारिका महाविद्यालय केंद्रांवर सकाळपासून शहरातील विविध भागातून ज्येष्ठ नागरिक लस घेण्यासाठी पोचले असताना सर्व्हर डाऊन असल्याचे कारण सांगत लसीकरण काम बंद केले.
सोमवारी 22 जणांना पाठवले परत
सोमवारी (दि. 1) ज्येष्ठांच्या लसीकरणाचा पहिला दिवस होता. मात्र, पहिल्या दिवशी दुपारनंतर सर्व्हर डाऊन झाल्याने एकूण 22 ज्येष्ठ नागरिकांना घरी परत पाठविण्यात आले. आज (दि. 2) सोमवारी परत गेलेल्या 22 जणांची वेगळी रांग केंद्रांवर लावण्यात आली. मात्र, आजही सर्व्हर बंद असल्याने या 22 जणांसह केंद्रावर आलेल्या अनेकांना लसीपासून वंचित राहावे लागले.