अमरावती : मेळघाटातील चिखलदरा परिक्षेत्रातल्या वैराट जंगलात दोन वाघांची प्रचंड झुंज झाली. या झुंजीत एक वाघ ठार झाल्याचे समोर आले आहे. शनिवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली.
अधिकाऱ्यांनी केली घटनास्थळाची पाहणी : वैराटच्या जंगलात व्याघ्र प्रकल्पाचे कर्मचारी शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गस्त घालित असताना पचंबा बीट मधील क्रमांक 34 या वनखंडामध्ये त्यांना एक वाघ मृत अवस्थेत आढळून आला. या बाबतची माहिती गुगामल वन्यजीव विभागात येणाऱ्या चिखलदरा येथील सहाय्यक वनरक्षक व निकम वनपरिक्षेत्राधिकारी मयूर भाईलो मे तसेच वन्यजीव संघटनेचे प्रतिनिधी राकेश महल्ले, अल्केश ठाकरे, वनपाल साळवे आणि वनरक्षक यांना मिळतात त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
मृत वाघाचे सर्व अवयव शाबूत : पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर धांदर यांच्या तपासणी अहवालानुसार मृत वाघाचे दात, नखे व इतर सर्व अवयव जागेवरच होते. तसेच प्रथम दर्शनी वाघाच्या मानेवर दुसऱ्या वाघाच्या दाताच्या खुणा आढळून आल्या. तसेच मृत वाघाच्या शरीरावर दुसऱ्या वाघाच्या नखांचे ओरखडे देखील आढळून आले. त्यामुळे या वाघाचा मृत्यू दुसऱ्या वाघासोबत झालेल्या झुंजीतच झाला हे स्पष्ट झाले आहे.