अमरावती:धामणगाव रेल्वे तालुक्यातील 14 हेक्टर शेती पैकी काही शेती दोन पुतण्यांनी गत आठ वर्षांत थोडी थोडी करून विकून टाकली. हा गंभीर प्रकार आता नऊ वर्षानंतर लक्षात आल्यावर काकांनी दत्तापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळगाव येथील रहिवासी घनश्याम यादवराव रुईकर आणि यवतमाळ जिल्ह्यातील नांजा येथील रहिवासी किशोर यादवराव रुईकर या दोघांविरुद्ध दत्तापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bogus power of attorney) (Land sale fraud) (Nephew cheats uncle) (Land sale On bogus document) (Land Selling Fraud Case)
असा घडला घटनाक्रम:दत्तापूर शेत शिवारात सुभाष रुईकर (62) यांचे आजोबा गणपत प्रल्हाद रुईकर यांच्या मालकीची 14 हेक्टर शेती होती. गणपत रुईकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जमिनीचा वारस म्हणून सुभाष रुईकर यांच्यासह सहा जणांची सात बारावर नोंद करण्यात आली. मात्र सुभाष रुईकर यांचे पुतणे किशोर रुईकर आणि घनश्याम रुईकर यांनी खोट्या मुक्तार पत्राचा वापर करून व खोटे घोषणापत्र सादर करून या शेतजमिनी पैकी काही जमीन ही 6 जानेवारी 2014 ते 26 ऑगस्ट 2022 दरम्यान थोडी थोडी करून परस्पर विकली. धामणगाव रेल्वे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात या जमीन विक्री व्यवहाराची नोंद देखील करण्यात आली. पुतण्यांनी परस्पर केलेल्या या कारभाराची माहिती सुभाष रुईकर यांना झाल्यावर त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालय गाठले. तेथे संपूर्ण प्रकाराची माहिती घेतल्यावर दत्तापूर पोलीस ठाण्यात पुतण्यां विरोधात तक्रार दिली.