अमरावती - वाढत्या तापमानामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेली आहे. याचा फटका चांदुर बाजार तालुक्यातील केळी पिकांना बसला आहे. वाढत्या उष्णतेमुळे या परिसरातील केळीची झाडे अर्ध्यावरच उन्मळून पडत आहेत. याचा आर्थिक फटका या तालुक्यातील केळीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याना बसणार आहे.
तापमानवाढीचा केळी बागांना फटका, दोनशे हेक्टर केळी पिकाचे नुकसान
वाढत्या तापमानामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेली आहे. याचा फटका चांदुर बाजार तालुक्यातील केळी पिकांना बसला आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांची जवळपास दोनशे हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली आहे. मात्र, गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने जमिनीतील पाणी पातळी खालावली आहे. परिणामी या भागातील विहिरी जवळपास आटल्या असून, कित्येक बोअरवेल निकामी झाल्या आहे, अशा परिस्थितीत पुरेशा पाण्याअभावी आपल्या केळीच्या बागा कशा वाचवाव्या हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा असतानाच, तीव्र उष्णतेमूळे केळी उन्हाने करपत असून झाडांना पाणी न मिळाल्याने परिपक्व झालेले केळीच्या घडांसह झाडे आपोआप उन्मळून खाली पडत आहे.
या परिसरातील शेतकरी दरवर्षी आर्थिक फायदा होईल म्हणून आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करून पिकांची लागवड करतो. परंतु, अशी बिकट स्तिथी निर्माण झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडतो, शासनाने यासाठी आर्थिक मदत करावी, अशी मागणी या भागातील केळी उत्पादकांनी केली आहे.
आता वाढलेल्या तापमानामुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकार काय दिलासा देते, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.