अमरावती - जंगलात गुरे चरायला सोडून परत येत असताना विहिरीत पाणी पिण्यासाठी उतरलेल्या दोन १५ वर्षीय जीवलग मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना अमरावती जिह्यातील मोर्शी रोडवर असलेल्या ब्राम्हणवाडा गोविंदपूर या छोट्याशा गावात शुक्रवारी सायंकाळी घडली. स्वप्निल संजय पेठे व रवी चरणदास अदमाने अशी या मुलांची नावे आहेत. त्यांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.
पाणी पिण्यासाठी विहिरीत उतरलेल्या दोन जीवलग मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू
अमरावती जिह्यातील ब्राम्हणवाडा गोविंदपूर या गावात जंगलातील विहिरीत पाणी पिण्यासाठी उतरलेल्या दोन १५ वर्षीय जीवलग मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. स्वप्निल संजय पेठे व रवी चरणदास अदमाने अशी या मुलांची नावे आहेत.
मृत स्वप्निल आणि रवी हे लहानपणापासून जीवलग मित्र आहेत. रवी अदमाने यांच्या वडिलांचा गुरे चारण्याचा व्यवसाय आहे. गावात भीषण पाणी टंचाई आहे. जनावरांना खायला चारा नाही, पिण्यासाठी पाणी नसल्याने स्वप्निलसुद्धा आपली जनावरे रवीचे बाबा चारत असलेल्या गुरांसोबत चरायला पाठवत होता. शुक्रवारी दोघेही मित्र वडिलांसोबत गुरे चरण्यासाठी जंगलात गेले. तिथून परत येत असताना तहान लागल्याने ते जंगलातील एका विहिरीजवळ आले.
विहिरीला पाणी भरपूर असल्याने दोघेही विहिरीत उतरत होते. याच दरम्यान एकाचा हात निसटल्याने दुसऱ्या मित्राने त्याचा हात पकडला. दरम्यान, दोघांचाही तोल गेल्याने ते पाण्यात पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. दोन्ही कुटुंबाची परिस्थिती अतिशय हलाकीची आहे. त्यामुळे शासनाने आम्हाला मदत करावी, अशी मागणी कुटुंबीय करत आहेत.