अमरावती- विभागीय मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या अमरावती शहरात एक नव्हे तर दोन कोरोना चाचणी प्रयोगशाळा स्थापन होण्याचा मार्ग सुकर होताना दिसत आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तसेच जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकिय महाविद्यालय रुग्णालय येथे या प्रयोगशाळा सुरु होणार आहेत.
मंगळवारी किंवा बुधवारी आवश्यक यंत्रसामग्रीची पूर्तता होण्याची शक्यता आहे. केंद्र स्तरावरील आयसीएमआर प्राधिकरणाद्वारे ऑनलाईन चाचणी करण्यात येईल. यानंतर या प्रयोगशाळांमध्ये कोरोनासोबतच अन्य संसर्गजन्य आजारांच्या चाचण्या सुरु होणार आहेत.
संपूर्ण देशभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. राज्यातही हा विषाणू पाय पसरताना दिसत आहे. अशावेळी अमरावतीसारख्या विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी कोरोनाचे निदान करणारी प्रयोगशाळा असावी, असा प्रस्ताव यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरंसिंगदरम्यान मांडला होता. नागपूर मुख्यालयी चार प्रयोगशाळा असताना अमरावती विभागासाठी किमान दोन प्रयोगशाळा का असू नये? असा मुद्दा उपस्थित करुन पालकमंत्र्यांनी अमरावतीत या प्रयोगशाळेची निकड संबंधितांना पटवून दिली होती. त्यानंतर यशोमती ठाकूर सातत्याने त्यासाठी प्रयत्नशिल होत्या. दरम्यानच्या कालावधीत अमरावती विद्यापीठ आणि पीडीएमसीने सदर प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी तयारी दर्शविली होती.
यशोमती ठाकूर यांनी या दोन्ही प्रस्तावाची सकारात्मक दखल घेतली आणि दोन्ही प्रयोगशाळा अमरावती शहरात कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले. विद्यापीठ आणि पीडीएमसीला प्रयोगशाळेसाठी आवश्यक असलेल्या यंत्रसामग्री खरेदीकरिता जितका निधी लागेल तितका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले . कोरोना महामारीचे गांभीर्य लक्षात घेऊन तो जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. तसे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दिले आहेत.
यासंदर्भात यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी सोमवारी चर्चा केली. केंद्र स्तरावरील आयसीएमआर प्राधिकरणाद्वारे ऑनलाईन निरिक्षण करण्यात येईल. यानंतर लगेच या दोन्ही प्रयोगशाळांमधून कोरोनासह अन्य संसर्गजन्य आजारांसाठी चाचण्या करुन निदान करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. सध्या अमरावती विभागातील कोरोनाच्या चाचण्यांसाठी थ्रोट स्वॅब नागपूरच्या प्रयोगशाळांमध्ये पाठविण्यात येत असल्याने त्याचे अहवाल उशिरा प्राप्त होत आहेत. अमरावतीमध्ये दोन प्रयोगशाळा स्थापन झाल्यानंतर ही अडचण दूर होणार आहे.