अमरावती - महाराष्ट्र शासनाच्या वतीने यावर्षी 33 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी नागरिकांनी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्राच्या वतीने शनिवारी सकाळी शहरातून वृक्षदिंडी काढण्यात आली. यामध्ये आयटीआय सह अनेक शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी शामील झाले होते.
चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्राच्या वतीने वृक्षदिंडीचे आयोजन
वाढत्या शहरीकरणामुळे झाडांची संख्या कमी झाल्याने वातावरणात बदल झाला आहे. तसेच प्रदूषणातही सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे शहरात मोठ्या संख्येने वृक्ष लागवड व संवर्धन करून प्रदूषण आणि नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. यासाठी शहरात जनजागृती करण्याच्या उद्देशाने चांदूर रेल्वेत वृक्षदिंडी काढण्यात आली.
शहरात जनजागृती करण्याच्या उद्देशाने चांदूर रेल्वेत वृक्षदिंडी काढण्यात आली
चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय येथे शनिवारी सकाळी 8 वाजता आमदार वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते वृक्ष दिंडीचे पूजन करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी तहसीलदार राजेंद्र इंगळे, नगराध्यक्ष शिट्टु उर्फ निलेश सूर्यवंशी, चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे, पुजा धांदे आदींची उपस्थिती होती.
या वृक्ष दिंडीमध्ये शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), जिल्हा परिषद हायस्कूल, बापूसाहेब देशमुख शिवाजी हायस्कूल, मन्नालाल गुप्ता विद्यालय, शाहू महाविद्यालय यांसह अनेक शाळा-महाविद्यालयांचे शिक्षक व विद्यार्थी सामील झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी 'कावळा म्हणते काव काव एक तरी झाड लाव', 'माकड म्हणते हूप हूप वृक्ष लावा खूप खूप' असे नारे देत जनजागृती केली. या वृक्षदिंडीमध्ये चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र व सामाजिक वनीकरणचे सर्व कर्मचारी सामील झाले होते.