अमरावती :मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागातील माताकोल संरक्षण कॅम्प नजीक कारा येथील एका युवकावर वाघाने हल्ला केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या युवकाला वाघाने फरफटत दरीत ओढून नेले असून घटनास्थळी त्याचा मोबाईल, पॅन्ट आढळून आले असून घटनास्थळावर रक्ताचा सडा पडला आहे. त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. राजेश रतिराम कास्देकर (28, रा. कारा) असे या युवकाचे नाव आहे.
बांबू तोडण्यासाठी गेला होता जंगलात :निस्ताराचे बांबू तोडण्यासाठी कारा येथील भुरेलाल कासदेकर, सुखलाल धांडे आणि राजेश कासदेकर हे तीन मजूर माताकोल संरक्षण कॅम्प परिसरात गेले होते. सोमवारी दुपारी त्यांच्यावर वाघाने हल्ला चढविला व राजेशला दरीत ओढून नेले. भुरेलाल कास्देकर, सुखलाल धांडे हे घाबरून एका झाडावर चढल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. घटनास्थळी रक्ताचा सडा साचला होता. वाघाने राजेशला खोल दरीत ओढत नेल्याने त्याचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.