अमरावती -देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असणाऱ्या कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीचे प्रतिरूप भातकुली तालुक्यातील गणोजा देवी येथील मंदिरातील श्री महालक्ष्मी आहे. नवरात्र उत्सवानिमित्त जिल्ह्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यातून भाविक गणोजा देवी येथील श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येत आहेत.
'अशी' आली कोल्हापूरची श्री महालक्ष्मी गणोजात
गणोजा गावापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गणोरी गाव येथील गणू महाराज नावाचे व्यक्ती कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे परमभक्त होऊन गेले. दरवर्षी गणू भट हे नवरात्रीला कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला जात असत. वृद्धावस्थेत आता मी श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी कोल्हापूरला येऊ शकणार नाही, असे गणू महाराज यांनी श्री महालक्ष्मीला सांगितले. तेव्हा महालक्ष्मीने मीच तुझ्या गावी येणार मात्र तुझे गाव येईपर्यंत तू मागे वळून पाहायचे नाही, असे गणू भट यांना सांगितले. गणू महाराज कोल्हापूरहून गणोरी गावाकडे निघाले असताना गणोरी गाव येण्याच्या पूर्वी तीन किलोमीटर अंतरावर त्यांनी मागे वळून पाहीले त्या क्षणीच त्यांच्या मागून येणारी श्री महालक्ष्मी आहे तेथेच अंतर्धान पावली. ज्या ठिकाणी श्री महालक्ष्मी अंतर्धान पावली ते गाव गणोजा होते. ही घटना घडल्यावर काही वर्षांनी गावालगत वाहणाऱ्या पेढी नदीत उत्खनन करताना काळ्या पाषाणाची तेजस्वी मूर्ती सापडली. कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीचे प्रतिरूप असणाऱ्या या मूर्तीचे ग्रामस्थांनी मार्गशीर्ष पौर्णिमेला प्राणप्रतिष्ठा केली. गावातच मंदिर उभारण्यात आले, अशी माहिती श्री महालक्ष्मी मंदिर संस्थानचे अध्यक्ष प्रभाकर केवले यांनी दिली. पेढी नदीच्या काठावर हे पूर्वमुखी भव्य मंदिर आहे. मंदिराचा घुमट दर्शनीय असून घुमटाच्या दगडावर कोरीव काम करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाला अमरावती जिल्ह्यासह अनेक भागातून भाविक श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येतात, असेही केवले यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
अष्टमीला होते होम पूजन