महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चक्क विहीरच गेली चोरीला! शेतमालक, सरपंचासह ग्रामसेवकावरही चौकशीचा फास - दुष्काळ

मराठी चित्रपटात कागदोपत्री विहीर चोरी गेल्याचे आपण पाहिले आहे. पण, ही गोष्ट प्रत्यक्षात घडली तर? खोट वाटेल ना? तिवसा तालुक्यातील एका ग्रामपंचायतची विहीर खरोखरच चोरीला गेली आहे. ज्या शेतमालकाने ही विहीर भाडेतत्त्वावर ग्रामपंचायतला मागितली होती. त्याच ग्रामपंचायतने ती विहीर शेतमालकाच्या नावे करून विहीर चोरी जाण्याची घटना सत्यात उतरवली आहे. ही महान आणि तेवढीच संतापजनक किमया केली आहे, गुरूदेव नगर ग्रामपंचायतने.

अमरावतीतील गुरुदेव नगर ग्रामपंचायतची विहिर चोरीला

By

Published : Jun 12, 2019, 3:41 PM IST

अमरावती - मराठी चित्रपटात कागदोपत्री विहीर चोरी गेल्याचे आपण पाहिले आहे. पण, ही गोष्ट प्रत्यक्षात घडली तर? खोट वाटेल ना? तिवसा तालुक्यातील एका ग्रामपंचायतची विहीर खरोखरच चोरीला गेली आहे. ज्या शेतमालकाने ही विहीर भाडेतत्त्वावर ग्रामपंचायतला मागितली होती. त्याच ग्रामपंचायतने ती विहीर शेतमालकाच्या नावे करून विहीर चोरी जाण्याची घटना सत्यात उतरवली आहे. ही महान आणि तेवढीच संतापजनक किमया केली आहे, गुरूदेव नगर ग्रामपंचायतने.

अमरावतीतील गुरुदेव नगर ग्रामपंचायतची विहिर चोरीला

यंदा राज्य दुष्काळाच्या छायेत जगत आहे. जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. यात ग्रामीण भागाच्या परिस्थितीचा विचार न केलेला बरा. तिवसा तालुक्यातील गुरुदेव नगरातील ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच वर्धा नदीतून गुरूदेव नगरला पाणी पुरवठा करणारे व्हॉल उघडे पडले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे प्रशासनाने येथे टँकर सुरू केले आहे.

असे असताना गुरूदेव ग्रामपंचायतने आपल्या हक्काची विहीर एका श्रीमंत शेतमालकाच्या सातबाऱ्यावर चढवून दुष्काळी झळा आणखी तीव्र करण्यासाठी हातभार लावला. त्याचे झाले असे, की गुरूदेव नगर ग्रामपंचायतची जी विहीर शेतमालकाला दिली त्या विहिरीला सध्या मुबलक पाणी आहे. ती विहीर जर आज गुरूदेवनगर ग्रामपंचायतच्या ताब्यात असती तर आज दुष्काळी परिस्थिती आली नसती. या विहीर चोरीच्या गंभीर प्रकरणाची तक्रार शिवसेनेने केल्यानंतर आता जिल्हा परिषद प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.

ग्रामपंचायत गुरूदेव नगरला बाराही महिने मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने २०००-०१ मध्ये मौजा विंचोरी सर्वे क्रमांक - १३२ मध्ये विहीर मान्य करण्यात आली होती. तिचे बांधकाम करून गुरूदेव नगरला पाणी पुरवठा करण्यात आला होता. ज्या शेतात या विहिरीचे बांधकाम झाले आहे, त्या शेताचे मालक नंदकिशोर जयस्वाल (रा. तळेगाव) ठाकूर यांनी शेतात पिकाला पाणी देण्यासाठी २०१६ मध्ये भाडेतत्त्वावर ग्रामपंचायतला विहिरीची मागणी केली होती. त्यासाठी त्या शेतमालकाने ग्रामपंचायतला रीतसर अर्जही केला होता. परंतु, ज्या शेतमालकाला २०१६ मध्ये भाडेतत्त्वावर विहीर दिली तो आज विहिरीचा मालक झाला कसा, असा प्रश्न लांजेवार यांनी उपस्थित केलेला होता.

विहिरीच्या ठिकाणी गुरुदेवनगर ग्रामपंचायतचे कुठलेही फलक नाही. तर त्याठिकाणी शेतमालक जयस्वाल यांच्या मालकीची विहीर असल्याचे फलक लावण्यात आले आहे, असा आरोप लांजेवार यांनी केला आहे. यासंबंधी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दत्ता धोमने यांच्याकडे याप्रकरणी चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी लांजेवार यांनी केली होती. त्यानुसार आता चौकशी सुरू झाली आहे. यामध्ये शेतमालक नंदकिशोर जयस्वाल, सहसरपंच तसेच जेव्हा ही विहीर जयस्वालला देण्यात आली तेव्हाचे सचिव यांची चौकशी सुरु आहे. तर ग्रामसेवक यांच्या भोवतीही चौकशीचा ससेमिरा लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details