अमरावती - कौटुंबीक वादातून विवाहितेचा छळ करून विवाहितेला तिच्या नवऱ्याने व सासऱ्यानेच रॉकेल ओतून जिवंत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना चांदूर बाजार तालुक्यातील कुऱ्हा देशमुख या गावात १५ जुलैला घडली. याप्रकरणी शिरजगाव कसबा पोलिसांनी पीडित महिलेच्या बयानावरून २० तारखेला पती व सासऱ्याला अटक केली आहे.
अमरावतीच्या कुऱ्हा गावात नवरा अन् सासऱ्याने विवाहितेला पेटवले - रॉकेल
अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील कुऱ्हा गावातील रोशनी गोलू पानसे या २३ वर्षीय महिलेला कौटुंबीक वादातून नवरा आणि सासऱ्याने रॉकेल ओतून जिवंत पेटवून दिले. या घटनेत विवाहिता गंभीर जखमी झाली. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील कुऱ्हा गावातील रोशनी गोलू पानसे ही २३ वर्षीय विवाहिता या घटनेत गंभीर भाजली आहे. रोशनी हिचा पती गोलू हा तिला वारंवार तू पसंत नाही, असे म्हणून तिचा नेहमी छळ करत होता. दरम्यान, घटनेच्या दिवशी रोशनी स्वयंपाक खोलीत काम करत असताना आरोपी पती गोलू पानसे व सासरा मुन्ना पानसे हे स्वयंपाक खोलीत जाऊन रोशनीला स्वयंपाक का केला नाही, असे म्हणत तिच्याशी वाद घातला.
नवरा गोलूने तिच्या अंगावर रॉकेल ओतल्याने ती जीव वाचवण्यासाठी पळत असताना सासरा मुन्ना याने तिला पकडले. त्यानंतर नवऱ्याने तिला पेटवून दिले. आगीने जळत असलेली रोशनी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडत असताना गावकऱ्यांनी तिला वाचवले. त्यानंतर तिला अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.