अमरावती - विदर्भातील काश्मीर म्हणून ओळख असलेल्या मेळघाटातील चिखलदऱ्यात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. गुरुवारी तापमानाचा पारा घसरुन ९ अंश सेल्सिअसवर आला आहे. त्यामुळे संपुर्ण चिखलदरा थंडीने गारठला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येथे गर्दी करत आहेत. संपूर्ण परिसरात धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळत आहे.
पर्यटनाचा आनंद
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मागील तीन दिवसांपासून राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडत आहे. त्यामुळे राज्यातील पर्यटन स्थळांवर मोठ्या संख्येने पर्यटक गर्दी करत आहे. मेळघाटातील चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने थंडीचा आनंद घेत आहेत. चिखलदारा येथील तापमान ९ अंश असून अमरावती जिल्ह्यातही तापमान ७.४ अंशावर आले आहे. त्यामुळे सकाळी फिरायला जाणाऱ्या लोकांमध्ये कमालीची घट झाली आहे.
थंडीत वाढ
गेल्या तीन-चार दिवसांपासून संपूर्ण राज्यात थंडीची लाट आली आहे. संपूर्ण राज्यातील जिल्हे गारठले आहेत. गेल्या आठवडाभरापासून तापमानात कमालीची घट होत आहे. आठवड्याभरात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे तापमानात सारखी वाढ होती होती. मात्र, सोमवारी व मंगळवारी जम्मू काश्मिरच्या पर्वतीय भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली. त्यानंतर उत्तरप्रदेशातील काही भागात झालेल्या गारपिटीमुळे थंड वारे पुन्हा सक्रिय झाले आहे. तसेच या वाऱ्यांचा वेग व प्रमाण देखील जास्त असल्याने उत्तर महाराष्ट्रात पुन्हा थंडीचे आगमन जिल्ह्यात झाले आहे. या आठवड्यात थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले होते.
गुरुवारी झालेली तापमानाची नोंद -
औरंगाबाद - 11 अंश
जळगाव - 11 अंश
जालना - 11.3 अंश
परभणी - 8.2 अंश