शिवसैनिक आणि काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक अमरावती Teacher Sexually Assaulting Student : अमरावती शहरातील एका शाळेतील शिक्षकानं विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केले आहेत, असा आरोप पालकांकडून करण्यात आलाय. त्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह शेकडो पालकांनी शाळेत धाव घेतलीय. संबंधित शिक्षकाला शाळेतून तत्काळ बडतर्फ करून कारवाई व्हावी, तसंच मुख्याध्यापकानं समोर येऊन आमच्याशी चर्चा करावी, अशी विनंती केलीय. शाळा प्रशासनानं पालक, शिवसैनिक आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी बोलण्यास नकार दिल्यामुळं शाळेच्या आवारात प्रचंड राडा झालाय.
शाळेत पोलिसांचा बंदोबस्त :शिवसैनिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी शाळेत प्रचंड राडा घातलाय. शहर कोतवाली पोलीस ठाण्यासह स्थानिक गुन्हे शाखेचं पथक शाळेत पोहोचलं. दंगा नियंत्रण पथकाला देखील शाळेत पाचारण करण्यात आलंय. शाळेत प्रचंड गोंधळ सुरू असताना मुख्याध्यापकानं शाळेतून पळ काढला. त्यांच्या दालनासमोर शाळेतील महिला शिक्षकांनी मुख्याध्यापक शाळेत नाही, कोणीही गोंधळ घालू नये अशी विनंती केलीय. दरम्यान मुख्याध्यापक शाळेतच लपून असल्याचा आरोप करीत शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुमारे दोन अडीच तासांपर्यंत प्रचंड गोंधळ घातला. पोलिसांनी मुख्याध्यापकांच्या बंद असणाऱ्या दालनासमोर पोलीस ताफा उभा केलाय. आंदोलकांना कुठल्याही परिस्थितीत मुख्याध्यापकांच्या दालनात शिरू दिलं नाही. मुख्याध्यापक शाळेतच नाही. आम्ही आंदोलकांची आणि मुख्याध्यापकांची नंतर कधी भेट घालून देऊ, असं पोलिसांच्या वतीनं वारंवार सांगण्यात आलं. मात्र, आंदोलक आपल्या भूमिकेवर बराच वेळ ठाम होते. शाळेत लहान मुलं असल्यामुळे आंदोलकांनीही काहीसं नमतं घेतलंय. मात्र, शाळा प्रशासनाला सोडणार नाही असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय.
मुख्याध्यापकाला चोप देण्याचा इशारा :शहरातील या शाळेत प्रवेशासाठी प्रचंड पैसा उकळला जातो. या शाळेत धर्मभेद केल्या जात असल्याचा आरोप देखील यावेळी शिवसैनिकांनी केलाय. हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. मुख्याध्यापकाला आज नाहीतर उद्या आम्ही नक्कीच चोप देऊ, असा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख परागुडे यांनी यावेळी दिलाय. संबंधित शिक्षक पोलिसांच्या ताब्यात आहे. तो जामिनावर सुटल्यानंतर त्याला देखील चोप देण्यात येईल, असा इशारा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल माटोडे यांनी दिलाय.
'असं' आहे प्रकरण :शाळेतील एक शिक्षक हा गत अनेक दिवसांपासून मुलींसोबत अश्लील प्रकार करीत असल्याचा आरोप आहे, अशी तक्रार पालकांच्या वतीनं शाळा प्रशासनाकडं एक सप्टेंबर रोजी करण्यात आली होती. शाळा प्रशासनानं सुरुवातीला हे प्रकरण दडपण्याची भूमिका घेतली. 12 सप्टेंबरला पालकांनी पुन्हा एकदा तक्रार केल्यावर या प्रकरणात शाळेच्या वतीनं समिती गठित करण्यात आली. अनेक विद्यार्थिनींचे जबाब नोंदविण्यात आले. त्यावेळी संबंधित शिक्षक दोषी असल्याचं आढळून आलंय, असं असताना देखील शाळा प्रशासनाच्या वतीनं शिक्षकावर कारवाई करण्यास तयारी दर्शविली नाही. अनेक संघटनांनी या प्रकरणात आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर या शाळेच्या प्रमुखांनी शुक्रवारी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर संबंधित शिक्षकविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आलीय.
हेही वाचा :
- Sexual Abuse With Student: तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थावर शिक्षकाकडून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार
- Unnatural Sex With Student : संस्थाचालकानं विद्यार्थ्याला तेल लावायला बोलवलं अन्....; संस्थाचालकाला अटक
- खासगी क्लासेस शिक्षकाचे अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील चाळे.. लातुरातील प्रकार