अमरावती - एका विद्यार्थीनीने प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न केल्याने प्रेमविवाह न करण्याची शपथ घेणाऱ्या चांदुर रेल्वेमधील महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी आता आंदोलन मागे घेतले आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थिनींना प्रेमविवाह न करण्याची शपथ दिल्यानंतर विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीने प्राचार्यांसह दोन प्राध्यापकांना निलंबित केले होते. हे निलंबन मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी तासिकेवर बहिष्कार टाकून विद्यार्थिनींनी आंदोलन सुरू केले होते.
हेही वाचा -मी शपथ घेते की.. महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी घेतली कधीही प्रेमविवाह न करण्याची शपथ
निलंबन मागे घेण्यासाठी १० दिवसांचा अल्टिमेटम देऊन या विद्यार्थिनी आजपासून तासिकेला बसणार आहेत. दरम्यान, दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे यांनीही शिक्षकांचे निलंबन मागे घेण्यासाठी हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित केला होता. हा प्रकार राज्यभर गाजला होता. प्रेमविवाह न करण्याची शपथ मुलींनाच का? असा सवालही भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला होता. चांदूर रेल्वे येथील महिला कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरादरम्यान मुलींना प्रेमविवाह न करण्याची शपथ देण्यात आली होती. या आगळ्यावेगळ्या शपथेवर राज्यभरातून टीका होत होती.
हेही वाचा -'प्रेमविवाह न करण्याची शपथ देणाऱ्या प्राध्यापकांचे निलंबन मागे घ्या'