अमरावती :गायी, म्हैस, बैल यांसारख्या मुक्या जनावरांना आजारपणात योग्य उपचार मिळावेत, यासाठी अमरावतीत अत्याधुनिक पशुवैद्यकीय दवाखाना स्थापन करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदुरा बुद्रुक या गावात महाराष्ट्रातील प्राण्यांचे पहिले पंचतारांकित रुग्णालय बांधण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते तसेच वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या रुग्णालयाचे उद्घाटन 28 जुलै रोजी करण्यात येणार आहे. गोकुलम गौरक्षण संस्थेच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या या पशुचिकित्सालयात प्राण्यांवर अगदी फाईव्ह स्टार दर्जाच्या वातावरणात उपचार केले जातील.
अशी आहे व्यवस्था :गोकुलम गौरक्षण संस्थेची स्थापना अमरावती शहरातील बालरोग तज्ञ डॉ. हेमंत मुरके यांच्या पुढाकाराने 2013 मध्ये नांदुरा बुद्रुक या गावात करण्यात आली होती. या ठिकाणी आजारी गायींवर उपचार करण्यासाठी पशु चिकित्सालय सुरू करण्यात आले होते. यासह अमरावती जिल्ह्यात कुठेही एखादी गाय आजारी पडली, तर तिला या गौरक्षण संस्थेत आणून तिच्यावर उपचार केले जात होते. यासाठी खास ॲम्बुलन्सची व्यवस्था देखील करण्यात आली होती. शहर, जिल्ह्यातील अनेक पशु पालकांसाठी गोकुलम गौरक्षण संस्था दिलासा देणारे केंद्र बनले होते. मात्र आता या ठिकाणी असणाऱ्या पशुचिकित्सालयाचे रूपांतर अत्याधुनिक अशा पशु चिकित्सालयामध्ये करण्यात आले आहे. या पशुचिकित्सालयामध्ये गायी, म्हशींवर गंभीर स्वरूपाच्या आजारात शस्त्रक्रिया करणे, एक्स-रे काढणे अशा सर्व सुविधा अत्याधुनिक मशिनरीच्या साह्याने केल्या जाणार आहे, अशी माहिती गोकुलम गौरक्षण संस्थेचे विश्वस्त विनय बोथरा यांनी ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
31 हजार 586 आजारी गोवंशावर उपचार :वृद्ध, भाकड अपघातग्रस्त गोवंशांची तसेच इतर प्राण्यांची सेवा गोकुलम गौरक्षण संस्थेत प्रामुख्याने केली जाते. सध्या या ठिकाणी एकूण 278 आजारी गोवंशांचे पालन पोषण केले जात आहे. अमरावती परिसरातील प्राणी, पशुपक्षींवर निशुल्क औषधोपचार, चिकित्सा शस्त्रक्रिया करणारी राज्यातील एकमेव संस्था म्हणून गोकुलम गौरक्षण संस्था ओळखली जाते. 2015 ते 2023 या आठ वर्षात एकूण 31 हजार 586 पशुपक्षी, प्राण्यांवर या ठिकाणी उपचार करण्यात आले आहेत. या संस्थेत चार पशुवैद्य सेवा देत असून 10 पेक्षा अधिक सेवानिवृत्त पशुसंवर्धन अधिकारी निशुल्क सेवा देत आहेत, असे महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य डॉ. सुनील सूर्यवंशी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
गोकुळम गौरक्षण संस्थेला लागणारा पैसा हा गौरक्षा संस्थेतील गायींच्या गोमूत्र आणि शेणातून विविध प्रयोगातून तयार होणाऱ्या खत औषधातून येतो. तसेच या ठिकाणी गोमूत्रापासून विविध आजारांवर उपयुक्त औषधी तयार केली जाते - डॉ. सुनील सूर्यवंशी