मुंबई- अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा पराभव नेमका कशामुळे झाला, याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अमरावतीच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांची बैठक बोलावली. यावेळी माजी खासदार अनंतराव गुढेही उपस्थित होते.
वाद मिटला तरी गद्दारीचा संशय कायम, खासदार आनंदराव अडसूळांचे पराभव प्रकरण
आनंदराव अडसूळ यांना पुन्हा अमरावती लोकसभा मतदारसंघातून दिलेली उमेदवारी काही शिवसैनिकांना रूचलेली नव्हती. अमरावतीचे माजी खासदार अनंतराव गुढे यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणामुळे हा वाद चव्हाट्यावर आला होता. अडसूळांच्या तक्रारीनंतर उद्धव ठाकरे यांना या प्रकरणाची दखल घ्यावी लागली होती.
अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांनी शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. अडसूळांना पुन्हा मतदारसंघातून दिलेली उमेदवारी काही शिवसैनिकांना रूचलेली नव्हती, स्थानिक शिवसैनिकांनी याची तक्रार थेट मातोश्रीवर केली होती. यानंतर निवडणूक दरम्यान अनंतराव गुढे यांचा एक कथित व्हिडिओ समोर आला होता. याचा आधार घेत पराभवानंतर अडसुळांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर अमरावतीच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांची बैठक बोलावली होती.
बैठकीनंतर अनंतराव गुढे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला, यावेळी त्यांनी "आता कोणताही वाद शिल्लक राहिला नाही. तो व्हिडिओ निवडणुकीपूर्वीचा आहे. निवडणूक पूर्वी महाशिवरात्रीला स्मशानभूमीत झालेल्या सर्व पक्षीय कार्यक्रमाचा तो व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओने शिवसैनिकांचे मन दुखावले असेल तर मी माफी मागतो. मी पक्षाचा काम करणारा माणूस आहे. शिवसेना माझी आई व मातोश्री हे मंदिर आहे." असे गुढे यावेळी म्हणाले. शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी "हा एक संघटनात्मक वाद होता. तो आता मिटला आहे व दोघांमध्ये संवाद झाला आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे वाद मिटवण्यासाठी सक्षम आहेत." अशी प्रतिक्रिया दिली.