अमरावती -औरंगाबाद शहराचा नामांतराचा वाद आता चांगलाच पेटला असून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये काँग्रेसवर टीका करण्यात आली होती. त्यानंतर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिले. आता शिवसेना ही ईडी आणि भाजपच्या प्रेशरमध्ये तर येत नाही ना, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे.
यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया हे किमान समान कार्यक्रमावर चालणारे -
'सामना'मध्ये सातत्याने काँग्रेसवर टीका करून काँग्रेसला चिमटे काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागच्या काळात शिवसेना व भाजपा एकत्र सत्तेत होते. त्यावेळी त्यांनी औरंगाबाद नामांतराचा विषय संपुष्टात आणायला पाहिजे होता, अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. महाविकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालणार आहे. परंतु या किमान समान कार्यक्रमामध्ये औरंगाबादच्या नामांतराचा विषय नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काय आहे वाद -
औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी मागील काही दिवसांपासून जोर धरत आहे. भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी ही मागणी लावून धरली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध केला होता. औरंगाबादच्या जनतेला आज नामांतरापेक्षा विकास महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले होते. त्यावरून संजयराऊत यांनी सामनाच्या 'रोखठोक'मध्ये काँग्रेसवर टीका केली. काँग्रेससारखे ‘सेक्युलर’ पक्ष औरंगाबादचे संभाजीनगर होऊ नये, या मताचे आहेत. औरंगाबादचे नामांतर केल्याने मुसलमान समाज म्हणजे अल्पसंख्याक नाराज होतील व परिणाम निवडणुकीच्यावेळी मुस्लीम मतांवर होईल. तसेच स्वतःच्या सेक्युलर प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अशी भीती कॉंग्रेसला आहे. त्यामुळे औरंगाबादचे नामांतर केल्याने लोकांचे, विकासाचे प्रश्न सुटणार आहेत काय? असे मुद्दे विरोध करणारे उपस्थित करत आहेत, असे त्यांनी म्हटले होते. त्यावरून काँग्रेसला सेक्युलरीजम शिकवण्याची काहीच गरज नसल्याचे मंत्री यशोमती ठाकूर यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले होते.
हेही वाचा - चिमुरड्यांना अमानुष मारहाण करणाऱ्या पित्यासह सावत्र आईविरोधात गुन्हा दाखल