अमरावती :महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली होती. आज त्यांच्या हातातून शिवसेना निसटली असून शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाले आहे. आता पुढचे टार्गेट शिवसेना भवन असून दादर येथील शिवसेना भवन लवकरच एकनाथ शिंदे यांना मिळणार असे बडनेराचे आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे.
राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा :अमरावती शहरातील राज्यापेठ उडान पुलावर आमदार रवी राणा यांनी 12 जानेवारी 2022 ला मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना केली होती. मात्र, हा पुतळा अनधिकृत असल्यामुळे महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी काढून टाकला होता. या प्रकारामुळे अमरावती शहरात चांगलाच गोंधळ उडाला होता. आज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांची तात्पुरती मूर्ती बसवून शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्यात आमदार रवी राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती केली. यावेळी येत्या दोन ते तीन महिन्यात राजापेठ उड्डाण पुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येईल अशी घोषणा आमदार रवी राणा यांनी केली.