अमरावती - महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत श्री शिवाजी शिक्षण संस्था संचालित डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाचे सात विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकाच वेळी सात विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केल्यामुळे अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
न्यायाधीशपदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये महेश पदवाड, स्मिता उके, गौरव तराळ, निकिता पाचडे, सुप्रिया देशमुख, दीपिका उपाध्याय, आणि नरेश उताणे यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाच्या वतीने खास एमपीएससी कोचिंग सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोचिंग सेंटरचे संचालक राजेश पाटील यांनी या विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीनही टप्प्यांची तयारी करून घेतली होती.