अमरावती -संपूर्ण जगाने धसका घेतलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, चित्रपटगृहे तरण तलाव, व्यायामशाळा, नाट्यगृहे 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आज जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पारित केले आहे.
कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार माजला असताना राज्य शासनाने शनिवारी राज्यातील सर्व शाळा महाविद्यालय बंद करण्याचे आदेश पारित केले होते. दरम्यान मुंबई पुण्याच्याच शाळा, महाविद्यालय बंद राहणार की काय, असा संभ्रम अनेकांच्या मनात होता. असे असताना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रविरारी राज्य शासनाच्या आदेशानुसार आपल्या वतीने आदेश पारित केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अमरावती महानगरपालिका क्षेत्रासह सर्व नगरपालिका नगरपंचायत तसेच ग्रामीण भागातील सर्व सरकारी व खासगी शाळा तसेच महाविद्यालय व्यवसायिक प्रशिक्षण केंद्र व खासगी शिकवणी वर्ग 31 मार्च पर्यंत बंद राहणार आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षा तसेच विद्यापीठाच्या परीक्षा मात्र ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेतल्या जाणार आहेत. आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही, यासाठी आवश्यक ती दक्षता व खबरदारी घेण्यात यावी असेही, जिल्हाधिकारी नवल यांनी म्हटले आहे.